राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी लोकसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले. राफेल विमान खरेदीवरुन करण्यात आलेला प्रत्येक आरोप खोडून काढताना त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.
संसदेतील त्यांचे भाषण ऐकून प्रभावित झालेले देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी टि्वटकरुन सीतारमन यांचे कौतुक केले. संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अरुण जेटली यांनी वेल डन! म्हटले आहे. तुम्ही बनावट प्रचार मोहिम हाणून पाडली. तुमच्या कामगिरीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे असे जेटली यांनी म्हटले आहे.
Well done! Smt. Nirmala Sitharaman ji, for an outstanding performance. You demolished the fake campaign. We are all proud of your performance. @nsitharaman
— Arun Jaitley (@arunjaitley) January 4, 2019
राफेलवरुन आरोपांना उत्तर देताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संरक्षण मंत्रालयाचे काम दलालीशिवाय चालते. बोफोर्स एक घोटाळा होता. राफेल हा राष्ट्रीय हित डोळयासमोर ठेऊन घेतलेला निर्णय आहे असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या. बोफोर्समुळे काँग्रेसची अधोगती झाली. पण राफेलमुळे भ्रष्टाचारमुक्त आणि नवीन भारत घडवण्यासाठी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.