माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी हे सोय पाहून मैत्री करणारे असून त्यांना पदे मिळाली नाहीत त्यामुळे त्या नाराजीतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका केली, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. शौरी यांनी सरकारची आर्थिक धोरणे, सामाजिक तणाव व विरोधी पक्षांशी असलेले संबंध याबाबत दूरचित्रवाणीवरील मुलाखतीत मोदींवर टीका केली होती. मोदी यांच्यावर त्यांनी केलेली टीका ही अन्याय्य आहे असे भाजपने म्हटले आहे. काही लोकांना पदे मिळाली नाहीत की त्या व्यक्ती संतप्त असतात व ते जे प्रश्न नाहीत ते प्रश्न आहेत असे भासवण्याचा प्रयत्न करतात अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. त्यामुळे ते योग्य बोलत आहेत की नाहीत हे सर्वाना समजते. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक वाढीच्या योग्य मार्गावर आहे.
शौरी हे विद्वान आहेत, प्रसिद्ध पत्रकार आहेत व राजकीय निरीक्षक आहेत, त्यांची काही मते असतील, पण या वेळी त्यांनी मोदींवर जरा अन्यायच केला आहे असेच म्हणावे लागेल असे वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. आर्थिकबाबतीत देश दिशाहीन आहे असे म्हणणे चुकीचे व निराशाजनक आहे.
ते सोय पाहणारे मित्र आहेत, जेव्हा त्यांना संधी मिळत नाही तेव्हा ते टीका करतात.
-संबित पात्रा, भाजप, प्रवक्ते