अरुणाचल प्रदेशात भाजपला निर्विवाद यश मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविणारे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी आपल्या आठ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तीन पक्षांचा प्रवास केला आहे.

पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे पुत्र. मुख्यमंत्रीपदी असताना खांडू यांचे २०११ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पेमा खांडू हे बिनविरोध निवडून आले होते. काँग्रेस सरकारमध्ये त्यांचा मंत्रिपदी समावेश झाला होता. २०११, २०१४, २०१९ आणि आता २०२४ मध्ये पेमा खांडू हे विधानसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत हे विशेष ! काँग्रेस सत्तेत असताना २०१६ मध्ये पेमा खांडू यांची ३६व्या वर्षी मुख्यमंत्रीपदी निवड झाली. तेव्हा केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपने आपला पाया विस्तारण्यावर भर दिला होता. पेमा खांडू यांनी तेव्हा भाजपबरोबर हातमिळवणी केली. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश या पक्षात काँग्रेसच्या सर्व ४३ आमदारांसह प्रवेश करून काँग्रेसला पहिला झटका दिला. थोड्याच दिवसांत पीपल्स पार्टीत सत्तासंघर्ष सुरू झाला. ४३ पैकी ३३ आमदारांना बरोबर घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा >>>रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणी अग्निसुरक्षा प्रात्यक्षिके घ्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अधिकाऱ्यांना आदेश

२०१६ मध्ये काँग्रेसने पेमा खांडू यांची मुख्यमंत्रीपद निवड केली होती. काहीच दिवसांत त्यांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश या स्थानिक पक्षात प्रवेश करून मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यावर पुन्हा मुख्यमंत्रीपद. गेल्या आठ वर्षांत तीन पक्षांचा राजकीय प्रवास केला असला तरी त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहिले आहे. भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने मुख्यमंत्रीपद पेमा खांडू हे कायम राहतील अशी चिन्हे आहेत.

अरुणाचल प्रदेशात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा १० उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. भाजपच्या विजयाची तेव्हाच सुरुवात झाली होती. ६० पैकी ४६ जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.