अहमदाबाद : २०२२ सालच्या गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल, तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा दोन दिवसांचा गुजरात दौरा रविवारी संपला. रविवारी त्यांनी स्थानिक धार्मिक व राजकीय नेत्यांशी, तसेच पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
शुक्रवारी रात्री अहमदाबादला येऊन पोहोचलेल्या या दोन नेत्यांनी साबरमतीतील गांधी आश्रमाला भेट दिली, निकोल ते बापूनगर दरम्यान रोड शो केला आणि नंतर शाहीबाग भागातील स्वामीनारायण मंदिराला भेट दिली.
शनिवारी सायंकाळी अहमदाबादेतील रोड शोनंतर, केजरीवाल व मान हे रविवारी सकाळी अहमदाबादच्या शाहीबाग भागातील स्वामीनारायण मंदिरात दर्शनासाठी गेले. केजरीवाल यांनी गुजरातच्या सामाजिक, धार्मिक व राजकीय नेत्यांच्या बंद दाराआड गाठीभेटी घेतल्या. यानंतर दोन्ही नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांचा अजेंडा निश्चित करण्यासाठी ‘आप’च्या कोअर समिती सदस्यांच्या एका उच्चस्तरीय बैठकीत हजेरी लावली, असे या पक्षाचे गुजरातचे प्रवक्ते योगेश जडवानी यांनी सांगितले.