Arvind Kejriwal Weight Loss : दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल हे दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळा प्रकरणातील एक आरोपी असून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग (सीबीआय) त्यांची चौकशी करत आहेत. केजरीवाल हे उच्च मधुमेहाचे रुग्ण असून तुरुंगात रवानगी झाल्यापासून सातत्याने त्यांची प्रकृती खालावत चालली असल्याचे दावे त्यांच्या पक्षातील नेते करत आहेत. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी दावा केला आहे की “मार्च महिन्यात केजरीवाल यांना तुरुंगात डांबल्यापासून आतापर्यंत त्यांचं ८.५ किलो वजन घटलं आहे.” मात्र तिहार तुरुंग प्रशासनाने हे दावे फेटाळून लावले आहेत.
तिहार तुरुंग अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे की “केजरीवाल यांचं वजन कमी झालं आहे, मात्र आप नेते दावा करत आहेत तितक्या प्रमाणात त्यांचं वजन घटलेलं नाही.” तुरुंग अधीक्षकांच्या या वक्तव्यानंतर आप नेते संजय सिंह म्हणाले, “तुरुंग प्रशासनाने मान्य केलं आहे की केजरीवाल यांचं वजन कमी झालं आहे.” दरम्यान, तिहार तुरुंग प्रशासनातील सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने वृत्त प्रसिद्ध केलं आहे की केजरीवाल यांचं केवळ दोन किलो वजन घटलं आहे.
आप नेत्यांचे वेगवेगळे दावे पाहून तिहार तुरुंग अधीक्षकांनी गृह विभागाला एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे, “१ एप्रिल २०२४ रोजी अरविंद केजरीवाल यांना पहिल्यांदा या तुरुंगात आणलं तेव्हा त्यांचं वजन ६५ किलोग्रॅम इतकं होतं. १० मे रोजी केजरीवाल जामीनावर तुरुंगातून सुटले तेव्हा त्यांच वजन ६४ किलोग्रॅम होतं.” सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांना २१ दिवसांसाठी अंतरिम जामीन दिला होता. १० मे ते १ जून असे २१ दिवस केजरीवाल यांनी देशभर आम आदमी पार्टीचा व इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. जामीनाचा अवधी संपल्यानंतर २ जून रोजी त्यांनी आत्मसमर्पण केलं. तुरुंग अधीक्षकांनी म्हटलं आहे, “२ जून रोजी त्यांचं वजन तपासण्यात आलं. तेव्हा त्यांचं वजन ६३.५ किलोग्रॅम इतकं होतं. आत्ता (१४ जुलै) त्यांचं वजन ६१.५ किलोग्रॅम इतकं आहे.”
हे ही वाचा >> Imran Khan’s PTI Ban : कधीकाळी सत्तेत असलेल्या पक्षावरच आता बंदी येणार? पाकिस्तानात पीटीआयचं भवितव्य धोक्यात! पण कारण काय?
साडेतीन महिन्यांत किती वजन घटलं?
तिहार तुरुंग अधीक्षकांच्या पत्रामधील माहितीनुसार केजरीवाल यांची तुरुंगात रवानगी झाल्यापासून आतापर्यंत त्यांचं वजन ३.५ किलोने घटलं आहे. म्हणजेच, आप नेत्यांचे ८.५ किलो वजन घटल्याचे दावे चुकीचे आहेत. कमी जेवल्यामुळे देखील वजन कमी होऊ शकतं, असंही तुरुंग अधीक्षकांनी त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे. अधीक्षकांनी सांगितलं की “वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली दररोज केजरीवाल यांच्या आरोग्य तपासण्या केल्या जात आहेत. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या सातत्याने आमच्या वैद्यकीय पथकाशी सल्लामसलत करत आहेत. केजरीवालांच्या अनेक तपासण्या सुनीता केजरीवाल यांच्यासमोर केल्या जात आहेत.”