पीटीआय, नवी दिल्ली
आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन झाडू’ मोहीम सुरू केल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला. भाजप ‘आप’कडे आव्हान म्हणून पाहत असल्याचे केजरीवाल म्हणाले. भाजपच्या मुख्यालयाबाहेर ‘आप’तर्फे निदर्शने करण्यात आली. त्यापूर्वी त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना संबोधित केले.
पक्षापुढे आणखी मोठी आव्हाने असतील, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयार राहावे, असे आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘आप’च्या उदयाबद्दल चिंता वाटते. हा पक्षा झपाटय़ाने वाढला आहे. त्यांनी आपल्या पक्षाला संपवण्यासाठी ‘ऑपरेशन झाडू’ सुरू केले आहे. येत्या काळात आपली बँक खाती गोठवली जातील आणि आपले कार्यालय देखील काढून घेतले जाईल त्यामुळे आपण रस्त्यावर येऊ’’
दुसरीकडे, भाजपने ‘आप’च्या प्रस्तावित मोर्चावरून केजरीवाल राजकीय नाटक करत असल्याची टीका केली. मालिवाल प्रकरणात भाजपने कट रचल्याचा निष्कर्ष ‘आप’ने कसा काय काढला असा प्रश्न दिल्ली भाजपचे प्रमुख विरेंद्र सचदेव यांनी विचारला.
हेही वाचा >>>“मी १२ वर्षांची असताना ज्योतिषाने पंतप्रधानपदाचं भविष्य वर्तवलं अन् बाबा संतापले”, प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा
भाजप मुख्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा
‘आप’च्या मोर्चाच्या घोषणेनंतर दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ‘आप’ने निदर्शनांसाठी कोणतीही परवानगी मागितली नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, मोर्चाची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले होते.
सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात?
स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचा डीव्हीआर ताब्यात घेतल्याचा दावा ‘आप’तर्फे रविवारी करण्यात आला.
हेही वाचा >>>मध्य प्रदेशात दलित दाम्पत्याला मारहाण
विभव कुमारना ५ दिवस पोलीस कोठडी
केजरीवाल यांचे वैयक्तिक सचिव विभव कुमार यांना दिल्ली न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडी महान्यायदंडाधिकारी गौरव गोयल यांच्यासमोर दिल्ली पोलिसांच्या अर्जावर शनिवारी मध्यरात्री सुनावणी झाली.
यापुढे आणखी मोठी आव्हाने असतील. त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. लक्षात ठेवा आपण भूतकाळात बऱ्याच आव्हानांचा सामना केला आहे. सत्याच्या मार्गावर चाला. आपल्याला समाजासाठी काम करायचे आहे. – अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली
हे अरविंद केजरीवाल यांचे नवीन राजकीय नाटक आहे. ते निदर्शने करण्यास आणि धरणे आंदोलन करण्यास मुक्त आहे, पण त्यांनी किमान एकदा तरी मालिवाल यांच्यासाठी बोलले पाहिजे.- विरेंद्र सचदेव, दिल्ली प्रमुख, भाजप