नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी येथील ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालयात एका पोलिसाने गैरवर्तन केल्याचा आरोप ‘आप’ने मंगळवारी केला. कथित अबकारी घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सिसोदिया यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १ जूनपर्यंत वाढ केली.
‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी या घटनेची चित्रफित ‘ट्विटर’वर प्रसृत करत लिहिले, की न्यायालयात सिसोदिया यांच्याशी या पोलीस कर्मचाऱ्याने धक्कादायक गैरवर्तन केले. दिल्ली पोलिसांनी त्याला तातडीने निलंबित केले पाहिजे.
दिल्ली पोलिसांनी मात्र हा आरोप अपप्रचाराचा भाग असल्याचे सांगून फेटाळून लावला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने माध्यमांशी संवाद साधणे, कायद्याचे उल्लंघन आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने केलेले वर्तन हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य व स्वाभाविक होते, असे पोलिसांनी नमुद केले. न्यायालयाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना सिसोदियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी निदर्शनास आणले, की दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखरला पोलीस कोठडीत असतानाही माध्यमांशी संवाद साधण्याची परवानगी दिली होती.