पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिहार तुरुंगात शरणागती पत्करली. न्यायालयाने त्यांना लोकसभा निवडणूक प्रचारासाठी १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यापूर्वी केजरीवाल यांनी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

केजरीवाल यांनी रविवारी सकाळी ‘आप’चे नेते आणि कार्यकर्ते यांना पक्ष कार्यालयात संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, मी भ्रष्टाचारात सहभागी असल्यामुळे तुरुंगात परत जात नाही तर हुकूमशाहीविरोधात आवाज उठवल्यामुळे तुरुंगात जात आहे. ते पुढे म्हणाले की, ‘‘मला सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवस दिले होते. हे २१ दिवस अविस्मरणीय होते. मी एकही मिनिट वाया घालवला नाही. मी देशाला वाचवण्यासाठी प्रचार केला. आम आदमी पक्ष महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे.’’ केजरीवाल १० मे रोजी तुरुंगातून बाहेर आले होते. त्यांच्यावर कथित दिल्ली मद्या घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>अरविंद केजरीवाल पुन्हा तिहारमध्ये; अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर शरणागती

भाजपच्या नेतृत्वाखाली रालोआ तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत असल्याचा अंदाज व्यक्त करणाऱ्या मतदानोत्तर चाचण्या बनावट असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला. हा दबावतंत्राचा भाग असल्याचे ते म्हणाले.

केजरीवाल तिहार तुरुंगात येण्यापूर्वी, तेथील वाहतूक मर्यादित करण्यात आली होती, तसेच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्यांच्याबरोबर पत्नी सुनीता केजरीवाल आणि आपचे नेते होते. त्यामध्ये आतिशी, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज, संजय सिंह इत्यादी नेत्यांचा समावेश होता.

भाजप निदर्शकाला अटक

केजरीवाल यांच्या राजघाट भेटीच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या अनेक भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यामध्ये दिल्लीचे पक्षप्रमुख वीरेंद्र सचदेव यांचाही समावेश होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही निदर्शकांना तिथून हटवून कमला मार्केट पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर जवळपास १०० भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी दिली.

५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

दिल्ली न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन संपल्यानंतर तिहार तुरुंगात शरण झाल्यानंतर केजरीवाल यांना दूरदृष्ट प्रणालीद्वारे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी हा आदेश दिला. तत्पूर्वी ईडीने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती.

मी राजघाटावर आदरांजली वाहिली. हुकूमशाहीचा अंत करण्यासाठी गांधीजी आपली प्रेरणा आहेत. मी हनुमान मंदिरात गेलो. मला बजरंगबलीचे आशीर्वाद आहे. ४ जूनला मंगळवार आहे. बजरंगबली हुकूमशाहीचा नाश करेल.अरविंद केजरीवालमुख्यमंत्री, दिल्ली

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal again in tihar surrender after expiry of interim bail amy
Show comments