एकीकडे देशभरात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असताना दुसरीकडे दोन राज्यांमधील घडामोडींनी लक्ष वेधलं आहे. बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे, तर दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपाकडून सरकार उलथवून टाकण्याचे प्रयत्न चालू असल्याचा दावा केला आहे. यासाठी अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भाजपाकडून दिल्ली सरकार पाडण्यासाठी जोरकसपणे प्रयत्न चालू असल्याचा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

अरविंद केजरीवाल यांनी पोस्टमध्ये भाजपाकडून २५ कोटींची ऑफर दिली जात असल्याचा दावा केला आहे. “गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या दिल्लीतील ७ आमदारांना संपर्क केला जात आहे. ‘काही दिवसांनी आम्ही केजरीवालला अटक करणार आहोत. त्यानंतर आमदारांना फोडलं जाईल. २१ आमदारांशी चर्चा झाली आहे. इतरांशीही चर्चा केली जात आहे. त्यानंतर दिल्लीतील आप सरकार आम्ही पाडू. तुम्हीही या. २५ कोटी रुपये आणि भाजपाकडून निवडणुकीचं तिकीट दिलं जाईल’ असं सांगितलं जात आहे”, असा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

“फक्त ७ आमदारांशीच संपर्क”

भाजपाकडून २१ आमदारांशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला असून आमच्या माहितीनुसार फक्त ७ आमदारांशीच त्यांनी संपर्क साधला आहे आणि त्या सगळ्यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे, असंही केजरीवाल यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“चौकशी घोटाळ्यासाठी नव्हे, तर…”

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांची मद्य घोटाळ्याप्रकरणी चौकशी चालू असून त्यावरही केजरीवाल यांनी मत व्यक्त केलं आहे. “या सगळ्याचा अर्थ मला कोणत्याही मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केली जात नाहीये. दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार उलथवून टाकण्याच्या षडयंत्राचा हा एक भाग आहे. गेल्या ९ वर्षांत असे अनेक प्रयत्न करण्यात आले. पण त्यात त्यांना यश आलं नाही. याहीवेळी त्यांना यश येणार नाही”, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

राजकीय गदारोळात विनोद तावडे बिहारमध्ये दाखल, भाजपा नितीश कुमारांना समर्थन देणार?

बिहारमध्ये काय घडतंय?

बिहारमध्ये नितीश कुमार सरकार जाऊन पुन्हा नितीश कुमार सरकारच स्थापन होणार असल्यचे दावे केले जात आहेत. अर्थात, नितीश कुमार राजदला सोडचिठ्ठी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर भाजपासोबत नवीन सरकार स्थापन केलं जाणार असून त्यात नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमवीर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal alleges bjp trying to topple delhi government offers 25 crores pmw
Show comments