Arvind Kejriwal alleges open distribution of money in Delhi assembly election : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आल्याचे पाहायला मिळत आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याकडून भाजपावर सातत्याने आरोप केले आज आहेत. यादरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडीओ निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांनी दिल्ली विधानभा निवडणुकीच्या तोंडावर खुलेआम पैसे आणि इतर साहित्य वाटले जात असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर हा गैरप्रकार पोलिसांच्या उपस्थित होत असल्याचे केजरीवाल म्हणाले आहेत.
केजरीवाल त्यांच्या निवेदनात म्हणाले की, “नेहमी निवडणुकीत बोललं जातं की मतदानापूर्वीची रात्र ही वैऱ्याची (कत्ल) असते. त्या रात्री मोठ्या प्रमाणात पैसे, कोंबडी, दारू वाटली जाते. पण दिल्लीची ही निवडणूक वेगळीच आहे. या निवडणुकीत दीड महिना आधीपासून खुले आम पैसा, साहित्य, बूट, अकराशे रुपये वाटले जात आहेत. कोणाला भीती देखील वाटत नाही की निवडणूक आयोग कारवाई करेल. पोलिसांच्या संरक्षणात हे वाटप केले जात आहे”.
“चादरी, साड्या, बूट, ब्लँकट,जॅकेट, राशन आणि सोन्याच्या साखळ्या वाटल्या जात आहे. हे आपल्या देशासाठी वाईट गोष्ट आहे”, असेही केजरीवाल यांनी नमूद केले आहे.
“हे साहित्य, पैसे वाटले जात आहे ते सरकारी पैशांनी वाटले जात नाही. हे यांच्या पक्षाचे काही नेते वाटत आहेत. हा पैसा कुठून आला? कोट्यवधी रुपये मते विकत घेण्यासाठी वाटले जात आहेत, हे यांच्याकडे कुठून आले? हा यांचा भ्रष्टाचाराचा पैसा आहे. जो यांनी देशाची लूट करून कमवला आहे”, असेही केजरीवाल म्हणालेत.
पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की, “माझं तुम्हाला निवेदन आहे की, हा पैसा यांनी देशाच्या जनतेची लूट करूनच कमावला आहे. हे जितका पैसा, सामान वाटत आहेत ते सगळं घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं मत मात्र विकू नका. अकराशे रुपये, एक साडी, चादर, एका बुटांच्या जोडीच्या बदल्यात तुमचं मत विकू नका, कारण ते बहुमूल्य आहे”.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे झाले आहेत. दिल्ली विधानसभेची निवडणूक आप या पक्षाने सलग दोनवेळा जिंकली आहे. भाजपाला ‘दिल्ली’ काबीज करायची आहे. त्यामुळे भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेस देखील निवडणुकीत जोरदार प्रचार करत आहे.