दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण मद्य धोरण घोटाळा प्रकरणात त्यांना राऊस अव्हेन्यू न्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सोमवारी या प्रकरणात सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना अटक झाली. आता कोठडीत असताना अरविंद केजरीवाल यांना घरचं जेवण देण्यास आणि गीता पठणास न्यायालयाने संमती दिली आहे. सीबीआय कोठडीत असताना अरविंद केजरीवाल यांना गीता या धर्मग्रंथाचं वाचन करण्याची मुभा असणार आहे. तसंच घरचं जेवणही त्यांना मिळणार आहे.

न्यायालयाने काय म्हटलं आहे?

अरविंद केजरीवाल हे सीबीआय कोठडीत असताना त्यांचा चष्मा वापरु शकतात. तसंच केजरीवाल रोज जी औषधं घेतात ती देखील त्यांना घेता येतील. त्यांना भगवद्गीतेची प्रत वाचनासाठी देण्यात येईल. घरी तयार केलेलं जेवण करता येईल आणि त्यांना कोठडीत असताना रोज एक तास त्यांच्या पत्नीला किंवा नातेवाईकांना भेटण्याचीही मुभा. याबाबतची संमती कोर्टाने दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी कोर्टाला ही विनंती केली होती की त्यांना गीता पठणाची संमती द्यावी जी विनंती कोर्टाने मान्य केली आहे.

हे पण वाचा- अरविंद केजरीवालांना दुहेरी धक्का; कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ED पाठोपाठ आता CBI कडून अटक

अरविंद केजरीवाल यांची ही मागणी अमान्य

अरविंद केजरीवाल यांनी कोर्टाला आणखी एक विनंती केली आहे. “पँट घातल्यानंतर त्यावर मला बेल्ट लावण्याची सवय आहे. तो बेल्ट मला देण्यात यावा. अन्यथा मला अवघडल्यासाखं होतं, त्यामुळे मी विनंती करतो की मला तो बेल्ट देण्यात यावा.” असं केजरीवाल यांनी म्हटलं होतं. मात्र ही विनंती विशेष न्यायमूर्ती अमिताभ रावत यांनी मान्य केलेली नाही. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक झाली होती, आता मद्य घोटाळा प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अरविंद केजरीवाल यांचे वकील ऋषिकेश कुमार यांनी बुधवारी काय म्हटलं?

अरविंद केजरीवाल यांचे वकील ऋषिकेश कुमार म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना राऊस अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सीबीआयने पाच दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना केवळ तीन दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. त्यांना २९ जून रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

अरविंद केजरीवाल यांना घरचं जेवण देण्याची तसेच त्यांच्या पत्नी आणि वकीलांना रोज भेटण्याची परवानगीही न्यायालयाने दिल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अरविंद केजरीवाल यांना लागणारी प्रत्येक वैद्यकीत मदत द्यावे, असे निर्देश न्यायालयाने सीबीआयला दिले असल्याची माहिती ऋषिकेश कुमार यांनी दिली.