दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांनी कृष्णानगरमधून, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीमधून आणि कॉंग्रेसचे अजय माकन यांनी सदरबझारमधून उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी या तिन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली.
बेदी आणि केजरीवाल संधिसाधू
किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही संधिसाधू असल्याची टीका अजय माकन यांनी पत्रकारांशी बोलताना केली. स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बेदी आणि केजरीवाल या दोघांनीही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला.
बेदी चर्चेपासून का पळताहेत?
किरण बेदी माझ्या चर्चेच्या निमंत्रणापासून का पळ काढताहेत, असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला. त्या सध्या कामामध्ये खूप व्यस्त आहेत. तरीही त्यातून चर्चेसाठी दोन तासांचा वेळ त्या काढू शकतात. दिल्लीतील प्रश्नांवर त्यांची भूमिका काय आहे, हे लोकांना जाणून घ्यायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
लाला लजपतराय यांच्या पुतळ्याला भाजपचे उपरणे
दिल्लीतील लाला लजपतराय यांच्या पुतळ्याला किरण बेदी यांनी भाजपचे उपरणे घातल्यामुळे बुधवारी नवा वाद उफाळून आला. किरण बेदी यांच्या या कृतीचा अरविंद केजरीवाल आणि अजय माकन यांनी निषेध केला. स्वातंत्र्यसैनिक हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत. ते देशाचे आहेत. त्यामुळे त्यांना कोणीही पक्षीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
‘बेदी आणि केजरीवाल यांनी स्वार्थासाठी अण्णा हजारेंचा वापर केला’
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
First published on: 21-01-2015 at 03:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal and kiran bedi are opportunists says ajay maken