नवी दिल्ली : ‘आप’ने दहा वर्षांच्या राजकीय प्रवासामध्ये पक्षाच्या वाढीसाठी लढलेल्या अनेकांना गमावले आहे. देशद्रोही घटक ‘आप’ला नष्ट करण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांच्या विरोधात लढण्याचे मोठे आव्हान आपल्याला स्वीकारावे लागेल. तुम्ही ‘आप’मध्ये असाल तर, तुरुंगात जाण्यास तयार राहा, असे आवाहन आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांना केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, मंगळवारी केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. ‘केवळ १० वर्षांच्या कारकीर्दीत राजकीय पक्षाने राष्ट्रीय दर्जा मिळवणे हे अविश्वसनीय आणि अद्भुत म्हणावे लागेल. आम्हाला एक आमदारदेखील जिंकून आणता येईल असे कोणाला वाटले नव्हते. पण, दशकभरात ‘आप’ राष्ट्रीय पक्ष बनला आहे’, असे केजरीवाल म्हणाले.
देशात १३०० राजकीय पक्ष असून फक्त ६ राष्ट्रीय पक्ष आहेत. एक वा एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये सत्ता असलेले पक्ष मात्र तीन आहेत. त्यामध्ये भाजप आणि काँग्रेससह ‘आप’चा समावेश होतो. ‘माझ्या टीकाकारांचे मी आभार मानतो. पक्ष उभा करताना ना पैसे होते, ना कार्यकर्ते. आताही पैसे नाहीत पण, कार्यकर्त्यांचे मोहोळ जमा झालेले आहे. आम्ही निमित्तमात्र आहोत. विधाता देशासाठी काही तरी करून घेऊ इच्छित असेल’, अशी भावना केजरीवाल यांनी व्यक्त केली.
‘पक्ष नष्ट करण्याचे प्रयत्न’
‘आप’ राष्ट्रीय स्तरावरील पक्ष झाल्यामुळे नव्या आव्हानांनाही सामोरे जावे लागेल. पक्षाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यांच्या धमक्या, गुंडागर्दी आणि तोडफोडींना घाबरू नका. ते तुम्हाला ८-१० महिने तुरुंगात टाकतील पण, त्यानंतर ते काहीही करू शकणार नाहीत. तुम्हाला जामीन मिळेल, असे सांगत केजरीवाल यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकार व भाजपवर टीका केली. केजरीवाल यांचे दोन विश्वासू सहकारी नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे आर्थिक घोटाळय़ांतील आरोपी असून सध्या तुरुंगात आहेत.