दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पूर्णपणे अविवेकी असल्याची खोचक टीका त्यांचे एकेकाळचे सहकारी प्रशांत भूषण यांनी केली असून, केजरीवाल स्वत:च्या फायद्यासाठी नरेंद्र मोदींशी देखील हातमिळवणी करतील, असा दावा देखील केला आहे. एका खासगी दौऱयानिमित्त प्रशांत भूषण हे सध्या अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका समूहाला संबोधित करताना प्रशांत भूषण म्हणाले की, केजरीवाल हे अविवेकी आहेत. त्यांना जेव्हा गरज वाटेल तेव्हा ते नक्कीच कसलाही विचार न करता मोदींशी हातमिळवणी करतील यात काहीच शंका नाही. स्वत:च्या फायद्यासाठी माझ्या आणि योगेंद्र यादवसारख्या व्यक्तींचा केजरीवाल यांनी उपयोग करून घेतला. त्याचवेळी त्यांनी आम आदमी पक्षातील निर्णय घेणाऱया विविध मंडळांवर स्वत:चे वर्चस्व राहील याची काळजी घेतली.
यासोबतच प्रशांत भूषण यांनी केजरीवालांची तुलना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी केली. केजरीवाल हे मनमोहन सिंग यांच्यासारखे आहेत. ते स्वत: कधी पैसे घेत नाहीत. पण पैसे घेणाऱयांना स्वत:च्या जवळ ठेवतात, असे प्रशांत भूषण म्हणाले.
आम आदमी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी मिळून स्वराज अभियानाची स्थापना केली आहे. स्वराज अभियानाचा राजकारणात उतरण्याचा सध्यातरी मानस आहे. स्वराज अभियानला आणखी मोठं होण्याची, समृद्ध होण्याची गरज आहे. त्यामुळे राजकारणातील प्रवेशाबाबतची तयारी करण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी जाईल. आपसोबत केलेली चूक आम्हाला पुन्हा करायची नाही, असेही भूषण पुढे म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा