नवी दिल्ली : भाजप त्यांचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांना लवकरच हटवणार आहे. आम आदमी पक्षाच्या (आप) आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीतील आव्हानांची धास्ती वाटत असल्यानेच भाजप हे पाऊल उचलत असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप’चे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केला.
गुजरातमध्ये या वर्षांखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह गुजरातचा दोन दिवसांचा प्रचार-संपर्क दौरा सुरू केला आहे. ते भावनगर येथील तरुणांशी शिक्षण आणि रोजगारप्रश्नांविषयी संवाद साधणार आहेत.
केजरीवाल यांनी ‘ट्वीट’मध्ये नमूद केले आहे, की गुजरातमध्ये भाजपने आम आदमी पक्षाची प्रचंड धास्ती घेतली आहे. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांना लवकरच या पदावरून हटवण्यात येणार आहे. भाजप घाबरले आहे काय? आगामी गुजरात विधानसभेतील भाजप आणि आप यांच्या राजकीय संघर्षांची केजरीवाल यांनी महाभारतातील ‘धर्मयुद्धा’शी तुलना केली. यात सत्ताधारी भाजपच्या बाजूने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) सैन्यशक्ती आहे. परंतु आपकडे भगवान श्रीकृष्णाचे भक्कम समर्थन व आशीर्वाद आहेत, असे सांगून केजरीवाल यांनी भाजपची कौरवांशी तुलना केली. साबरकंठा जिल्ह्यातील हिम्मतनगरमध्ये ते बोलत होते.
भाजपशासित गुजरात बदलासाठी व्याकूळ आहे. त्यामुळे ‘आप’ला जनतेकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच ‘सीबीआय’ने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी छापे टाकले.
– अरिवद केजरीवाल, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक