भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी खेळाडूंकडून जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आज जंतरमंतरवर खेळांडूची भेट घेत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दरम्यान, यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकाही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “…तर तो माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल”, महिला कुस्तीपटूंच्या आरोपांवर बृजभूषण सिंहांचं कवितेद्वारे भाष्य

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

“देशासाठी पदक जिंकणारे खेळाडू गेल्या एका आठवड्यापासून जंतरमंतर आंदोलन करत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी लाजीरवाणी बाब आहे. केंद्र सरकारने अद्यापही या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. हा खेळाडूंचा अपमान आहे. खरं तर महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्यांना थेट फासावर चढवलं पाहिजे”, अशी संतप्त प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली.

यावेळी बोलताना, ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोदी सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार टीका केली. “ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे खासदार असल्याने मोदी सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. सरकारने या खेळाडूंच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. न्यायासाठी या खेळाडूंना सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो, हे दुर्देवी आहे”, असे ते म्हणाले. तसेच जे लोक भारतावर प्रेम करतात, त्यांनी एक दिवस सुट्टी काढून खेळाडूंच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केलं.

हेही वाचा – VIDEO : “मी पूर्णपणे निर्दोष, आरोपी बनून…”, गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया

दरम्यान, महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी दखल घेतली असून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर ‘पोक्सो’सह आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या खेळाडूंनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र, ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal criticized modi government for not taking action against brij bhushan sharan singh in sexual abuse alligation spb
Show comments