Arvind Kejriwal Declares Assets ahead of Delhi Polls : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदाना उतरत आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाकडे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार अरविंद केजरीवाल यांच्याकडे १.७३ कोटींची संपत्ती असून त्यांच्याकडे स्वत:चं घर किंवा गाडी नसल्याचे समोर आलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याची जंगम मालमत्ता ३,४६ लाख रुपये आहे, ज्यात २.९६ लाख रुपये बँकेत बचत म्हणून ठेवलेले आहेत. तर ५० हजार रुपये रोख आहेत. गाझियाबादमधील फ्लॅटसह त्यांची स्थावर मालमत्ता १.७ कोटी रूपयांची आहे. तसेच केजरीवाल यांनी मुदत ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा विमा पॉलिसींमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.
अरविंद केजरीवाल यांच्या वार्षिक उत्पन्न देखील गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाल्याचे आढळून आले आहे. २०२० साली त्यांनी जाहीर केलेल्या ४४.९० लाख रुपयांच्या उत्पन्नावरून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये त्यांचे उत्पन्न ७.२१ लाख रुपये इतके खाली घसरले आहे. केजरीवाल यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा त्यांना आमदार म्हणून मिळणारा पगार हा आहे.
पत्नी सुनीता केजरीवाल यांचं उत्पन्न किती?
अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल या निवृत्त सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांची संपत्ती २.५ कोटी रुपये आहे. त्याच्या जंगम मालमत्ता १ कोटींची आहे, ज्यामध्ये २५ लाख रुपये किमतीचे ३२० ग्रॅम सोने आणि ९२ हजार रुपये किमतीची चांदी आहे.
सुनीता केजरीवाल यांच्या स्थावर संपत्तीमध्ये गुरूग्राममधील एक घर आहे ज्याची किंमत दीड कोटी रुपये आहे. तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न १४.१० लाख रूपये आहे, जे पती अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत माजी सरकारी अधिकारी म्हणून मिळणारी पेन्शन हा आहे.
केजरीवाल दाम्पत्याची एकत्रित संपत्ती ४.२३ कोटी रुपये आहे, मागच्या वेळी संपत्ती जाहीर केली होती त्यानुसार त्यांच्या संपत्तीमध्ये एक स्थिर वाढ झाल्याचे दिसून येते. केजरीवाल यांनी २०२० मध्ये ३.४ कोटी रुपये आणि २०१५ मध्ये २.१ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. संपत्तीबरोबरच केजरीवाल यांनी जाहीर केलं की त्यांच्याविरुद्ध १४ गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत.
दरम्यान केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पत्नीसह हनुमान आणि वाल्मिकी मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी समर्थकांना संबोधित करताना त्यांनी मतदारांना राजकीय आरोपांएवजी त्यांच्या सरकारने केलेल्या कामावर लक्ष देण्याचे आवाहन केले.
दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान
२०१३ पासून नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल निवडून येत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत केजरीवाल यांच्यासमोर भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचे आव्हान असणार आहे.