दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सहा जणांना बदनामीच्या खटल्यामध्ये गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात दिल्लीतील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यामध्ये न्यायालयाने केजरीवाल यांच्यासह सहा जणांना समन्स बजावले होते. डीडीसीएतील गैरव्यवहारांच्या आरोपांनंतर जेटली यांनी केजरीवालांविरोधात बदनामीचा खटला दाखल केला.
अरविंद केजरीवाल गुरुवारी न्यायालयात हजर झाल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी सुमीत दास यांनी त्यांना आणि इतर पाच जणांना जामीन मंजूर केला. यामध्ये कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंग, राघव चढ्ढा आणि दीपक वाजपेयी यांचा समावेश आहे. २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला.