नवी दिल्ली : भाजपविरोधातील महाआघाडीच्या बैठकीआधी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी स्वपक्षीय हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला आहे. या बैठकीत केंद्राच्या वटहुकूमाच्या विषयावर सर्वप्रथम चर्चेचा आग्रह त्यांनी धरला असून, याबाबत विरोधी पक्षांना पत्र पाठवले आहे. भाजपेतर १५-१६ पक्षांच्या नेत्यांची बैठक शुक्रवारी पाटणा येथे होणार असली तरी, या बैठकीची विषयपत्रिका अद्याप निश्चित झालेला नाही.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षांना पत्र लिहिले असून, केंद्राच्या दिल्ली सरकारविरोधी वटहुकुमावरच बैठकीत सर्वप्रथम चर्चा झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली आहे. केंद्राच्या वटहुकुमाला एकमुखी विरोध केला नाही तर, इतर राज्यांचे अधिकारही वटहुकुमाद्वारे काढून घेतले जातील. ही भीती सत्यात उतरण्याआधी विरोधकांनी सावध झाले पाहिजे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. या मुद्यावर इतर भाजपेतर पक्षांनी पाठिंबा दिला असला तरी, काँग्रेसने भूमिका स्पष्ट न केल्याने ‘आप’ने पत्राद्वारे काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास काँग्रेसने उत्तर दिलेले नाही. ‘भाजपविरोधात एकत्र लढण्यासाठी पाटण्यातील बैठक होत असून ही योग्य सुरुवात म्हटली पाहिजे’, असे काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल म्हणाले.
या बैठकीमध्ये काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल पटेल, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल, शिवसेना- ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, ‘द्रमुक’चे सर्वेसर्वा स्टॅलिन, ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी, ‘भाकप’चे महासचिव डी. राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला आदी उपस्थित राहू शकतील. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री व ‘भारत राष्ट्र समिती’चे प्रमुख के. चंद्रशेखर राव बैठकीत सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे समजते.
भाजपचीही एकजूट
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या महाआघाडीचे समन्वयक होण्याची मनीषा बाळगल्याने भाजपने त्यांना बिहारमध्येच अडचणीत आणण्याचा डाव टाकला आहे. नितीशकुमार यांचे पूर्वाश्रमीचे विश्वासू ‘हिंदूस्थानी आवामी मोर्चा’चे प्रमुख जीतनराम मांझी यांनी नितीशकुमार यांच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. मांझींनी बुधवारी दिल्लीत शहांची भेट घेतल्याने जनता दल (सं), राष्ट्रीय जनत दल व काँग्रेस यांच्या आघाडीविरोधात भाजपने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांच्या महाआघाडीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अमित शहा तसेच, भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा हेही बिहारचा दौरा करणार आहेत. भाजपने विरोधी पक्षांविरोधात बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याची आखणी केली आहे. ‘विरोधी पक्षांची पाटण्यातील बैठक म्हणजे भाजपेतर पक्षांनी काँग्रेसमुक्त भारतासाठी केलेली एकजूट आहे’, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदींनी केली.
भाजपचीही मोर्चेबांधणी
नितीशकुमार यांच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेणारे ‘हिंदूस्थानी आवामी मोर्चा’चे प्रमुख जीतनराम मांझी यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यामुळे भाजपने बिहारमध्ये जनता दल (सं), राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या आघाडीविरोधात मोर्चेबांधणी सुरू केल्याचे स्पष्ट झाले.