आम आदमी पक्षाचे(आप) माजी नेते प्रशांत भूषण यांनी शनिवारी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे दांभिक आणि निर्लज्ज असल्याची सणसणीत टीका केली. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची काही दिवसांपूर्वी पक्षविरोधी कारावायांच्या आरोपांवरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव पक्षात परतल्यास मला आनंद होईल, असे म्हटले होते. केजरीवालांच्या या वक्तव्याचा भूषण यांनी ट्विटरवरून चांगलाच समाचार घेतला. पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत समर्थक आमदारांकरवी आम्हाला शिवीगाळ आणि मारहाण केल्यानंतर आता ते आम्हाला पक्षात परत येण्यास सांगत आहेत. केजरीवाल हे दांभिक आणि निर्लज्ज आहेत, असे भूषण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी प्रशांत भूषण यांनी आपचे माजी शिक्षणमंत्री जितेंद्रसिंग तोमर यांच्या बनावट पदवीप्रकरणाबाबतही भाष्य केले. तोमर यांनी आपल्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत अंधारात ठेवले होते हा केजरीवालांचा दावा खोटा असल्याचेही प्रशांत भूषण यांनी सांगितले. तर योगेंद्र यादव यांनीदेखील केजरीवालांवर टीका करताना त्यांच्यामुळे ‘आप’ प्रामाणिक राजकारणापासून दूर गेल्याचे सांगितले.

Story img Loader