नवी दिल्ली : कथित मद्या घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली न्यायालयाने बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे न्यायालयात हजर केल्यानंतर विशेष न्यायाधीश निया बिंदू यांनी कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला.
सुनावणीदरम्यान केजरीवाल यांच्या वकिलांनी कोठडी वाढवण्यास कोणतेही कारण नसल्याचे सांगत ‘ईडी’च्या अर्जाला विरोध केला होता. या प्रकरणात केजरीवाल यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरही न्यायाधीशांनी सुनावणी घेतली. या अर्जावर न्यायाधीश गुरुवारी पुन्हा युक्तिवाद करणार आहेत.
हेही वाचा >>>केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! १४ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत केली मोठी वाढ, ‘हे’ आहेत नवे दर
दरम्यान, केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षासाठी १०० कोटी रुपयांची लाच मागितली, असा दावा ईडीने न्यायालयात जामीन अर्जाला विरोध करताना केला. या प्रकरणात आम आदमी पक्षाला आरोपी म्हणून उभे केले आहे. त्यामुळे गुन्हा केलाच असेल तर पक्षाचा प्रभारी व्यक्ती दोषी असेल. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते, तेव्हा आपचे नाव आरोपी म्हणून नव्हते, असेही ईडीने न्यायालयाचा निदर्शनास आणले.