दिल्लीतील परिसंवादात केजरीवाल-ममतांची उपस्थिती
बिहार विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रीय राजकारणात आम आदमी पक्ष व तृणमूल काँग्रेसने भाजपविरोधी आघाडीची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. संघराज्य पद्धतीवर आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आयोजित केलेल्या परिसंवादास उपस्थित राहून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी परंतु बिगरकाँग्रेसी आघाडीला भक्कम केले आहे.
बिहारमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागल्यास या आघाडीत जदयूचे नितीशकुमार व राजदचे लालूप्रसाद यादव यांना समाविष्ट केले जाणार असल्याचा दावा ‘आप’च्या सूत्रांनी केला. मात्र लालूप्रसाद यादव यांच्याशी जुळवून घेण्यास केजरीवाल फारसे उत्सुक नाहीत. भाजपने आता पश्चिम बंगाल व दक्षिणेतील राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे ममतादिदी यांनी दिल्लीत केजरीवाल संवाद वाढवून भाजपच्या शत्रूला मित्र केले आहे.
बिगर भाजप-काँग्रेसी मुख्यमंत्र्यांना या परिसंवादाला येण्याचे निमंत्रण केजरीवाल यांनी दिले होते. त्यापैकी तीन मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे समर्थन, तर एका मुख्यमंत्र्याने अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. संघराज्यांच्या समस्यांवर आयोजित या परिसंवादात राज्यांच्या पीछेहाटीस केंद्राला जबाबदार धरून बॅनर्जी व केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली. उभय नेत्यांमुळे दिल्लीत नवी समीकरणे जुळून आली आहेत. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्राकडून सीबीआयचे अस्त्र उगारले जाण्याची भीती असल्याने बॅनर्जी यांनी केजरीवाल यांच्याशी जुळवून घेतले आहे. केंद्र सरकारचा सर्वाधिक संघर्ष दिल्ली राज्य सरकारशी होत असतो. त्यामुळे केजरीवाल यांनी केलेल्या टीकेला महत्त्व असते. अशावेळी केजरीवाल यांना हाताशी धरल्यास भाजपविरोध तीव्र करण्याची आशा बॅनर्जी यांना आहे. यासाठी बॅनर्जी यांनी राज्यसभा खासदार डेरेक ओ’ब्रायन यांना जबाबदारी दिली आहे.