दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि बंडखोर नेते योगेंद्र यादव यांना फौजदारी स्वरूपाच्या बदनामीच्या खटल्यात मंगळवारी दिल्लीतील न्यायालयात हजर राहणे भाग पडले. यापूर्वी हे नेते न्यायालयात गैरहजर राहिले होते, तेव्हा सदर नेत्यांना कायद्याबद्दल आदर नाही, असा शेरा न्यायमूर्तीनी मारला होता.
केजरीवाल, सिसोदिया आणि यादव न्यायालयात का गैरहजर राहिले ते कळत नाही. त्यांना कायद्याबद्दल आदर नाही. एकही आरोपी न्यायालयात हजर नाही त्यामुळे या खटल्याची सुनावणी दुपारी दोन वाजता होईल, असे महानगर दंडाधिकारी मयूरी सिंह म्हणाल्या.
न्यायालयात गैरहजर राहण्याची सवलत देण्यात यावी, अशी या तिघांनी केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर तिघेही न्यायालयात हजर राहिले तेव्हा दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी २ मे रोजी घेण्याचे निश्चित केले.
दिल्लीचे मुख्यमंत्रीच न्यायालयात हजर राहिल्याने न्यायालयात आणि संकुलात गर्दी जमली होती. त्यामुळे बघ्यांना न्यायालयातून बाहेर जाण्याचे आदेश महानगर दंडाधिकाऱ्यांना द्यावे लागले.

Story img Loader