विराट जनसागराच्या साक्षीने फक्त आणि फक्त विकासाची भाषा बोलत आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ऐतिहासिक ६७ जागांच्या महाप्रचंड बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन करणाऱ्या केजरीवाल यांच्यासमवेत अन्य सहा जणांचा शपथविधी दिल्लीच्या रामलीला मैदानावर पार पडला. शपथविधीनंतर आपल्या भाषणात केजरीवाल यांनी पुढील पाच वर्षे दिल्ली सोडून इतर कुठेही निवडणूक लढवणार नसल्याचे सांगून मागील सरकारमध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचे आश्वासन दिले. केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश सांभाळावा, दिल्ली आमच्यावर सोपवून दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा. लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय अहंकारातून घेतल्याची कबुली केजरीवाल यांनी दिली. दरम्यान कोणतेही खाते न स्वीकारता सर्वच खात्यांवर केजरीवाल देखरेख ठेवणार आहेत.
केजरीवाल यांच्या शपथविधीसाठी रामलीला मैदानावर लाखभर समर्थक उपस्थित होते. व्यासपीठावर आगमन होताच ‘पाँच साल केजरीवाल’, ‘केजरीवाल-केजरीवाल’च्या घोषणा निनादल्या. घोषणा सुरूच असताना नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांना शपथ देण्यास सुरुवात केली. केजरीवाल, त्यानंतर मनीष सिसोदिया, असीम अहमद खान, संदीप कुमार, सत्येंद्र जैन, गोपाल रॉय व शेवटी जितेंद्र सिंह यांनी शपथ घेतली.
खातेवाटप
*मनीष सिसोदिया- उपमुख्यमंत्री तसेच अर्थ, नियोजन, महसूल, उच्च शिक्षण, नगरविकास.
*गोपाल राय- परिवहन, कामगार, सामान्य प्रशासन, रोजगार.
*संदीप कुमार- महिला व बालकल्याण, समाजकल्याण, अनुसूचित जाती व जमाती.
*असिम अहमद खान- अन्न व नागरी पुरवठा, पर्यावरण व वन.
*जितेंद्रसिंह तोमर- कायदा व न्याय, गृह, पर्यटन, सांस्कृतिक.
*सतेंद्र जैन- ऊर्जा, आरोग्य, उद्योग, सार्वजनिक बांधकाम.
‘अहंकार सोडा’
काँग्रेस व भाजपची वाताहत अहंकारामुळे झाली. त्यामुळे अहंकारापासून दूर राहण्याचे आवाहन केजरीवाल यांनी आपल्या समर्थकांना केले. लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय चुकीचा होता. त्यातून धडा घेत, अहंकारापासून दूर राहून पुढील पाच वर्षे केवळ दिल्लीचाच विकास करणार असल्याची घोषणा करून केजरीवाल यांनी अनेक राजकीय समीकरणे फोल ठरवली. ‘आप’ पश्चिम बंगाल, बिहारमध्ये प्रचार करणार असल्याचा प्रचार गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होता. केजरीवाल यांनी अप्रत्यक्षपणे कुणाही प्रादेशिक पक्षाच्या प्रचाराला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
हा तर ‘कुदरत का करिश्मा’
७० पैकी ६७ जागा जिंकणे हा तर ‘कुदरत का करिश्मा’ आहे. विधात्याला आपल्याकडून मोठे काम करून घ्यायचे आहे. हा ईश्वरी संकेत समजून काम करावे लागेल. दिल्लीचा विकास व्हावा, ही ईश्वरी इच्छा आहे; आपण केवळ निमित्तमात्र आहोत, असे केजरीवाल म्हणाले. काहीसे भावनिक आवाहन झाल्यावर मात्र केजरीवाल यांनी पक्ष व सरकारसमोरील विविध आव्हानांची मांडणी केली. विकास करण्यासाठी पैसा लागतो. दिल्ली सरकारकडे जेवढा पैसा आहे, त्यातदेखील चांगला विकास होऊ शकतो. फक्त त्यासाठी नियत चांगली हवी, असे ते म्हणाले. व्यापाऱ्यांनी पूर्ण कर भरावा; यापुढे कराच्या रकमेवर कुणीही डल्ला मारणार नाही. त्याच पैशातून व्यापारी संकुल, रस्ते, वीज, पाणी व्यवस्था सुधारली जाईल. दिल्ली हे भारतातील ‘भ्रष्टाचारमुक्त’ होणारे पहिले राज्य असेल, असे ठोस प्रतिपादन त्यांनी केले.