Arvind Kejriwal On Delhi CM Atishi : दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, दिल्लीत निवडणुकीच्या आधी मोठ्या राजकीय घडामोडी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्यामुळे दिल्लीतील राजकारण तापलं आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर आप सरकारकडून दिल्लीकरांसाठी काही योजनांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, दिल्लीतील आप सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री महिला सन्मान’ आणि संजीवनी योजनेवरून राजकारण तापलं आहे. यातच आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंभीर आरोप केला आहे.
“दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना महिलांसाठी मोफत बस प्रवासाशी संबंधित बनावट प्रकरणात अटक केली जाऊ शकते”, असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या या विधानामुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून आम आदमी पक्षाचे लक्ष विचलित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून अशा पद्धतीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
केजरीवाल यांनी दावा केला आहे की, “ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाची एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी आणि वरिष्ठ आप नेत्यांवर छापे टाकण्यासाठी त्यांना वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनुसार समोर आली आहे. तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना मोफत बस प्रवासाशी संबंधित खोट्या प्रकरणात अटक केली जाऊ शकते. मात्र, मी जिवंत असेपर्यंत महिलांसाठी मोफत बसची योजना थांबवू देणार नाही”, असं केजरीवालांनी म्हटलं आहे.
CM आतिशी जी को फ़र्ज़ी केस में गिरफ़्तार करने की रची जा रही साज़िश‼️
— AAP (@AamAadmiParty) December 25, 2024
♦️ केंद्र की जांच एजेंसियां अब CM @AtishiAAP जी के ख़िलाफ़ कोई फ़र्ज़ी केस बनाकर उन्हें गिरफ़्तार करना चाहती है
♦️ AAP के वरिष्ठ नेताओं के यहां भी छापा मारने का षड्यंत्र रचा जा रहा है
♦️ BJP वाले महिलाओं की… pic.twitter.com/c1VANPXupe
मुख्यमंत्री आतिशी यांनी काय म्हटलं?
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या की, “दिल्लीत महिलांसाठी मोफत बस प्रवास बंद करण्यासाठी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि यापुढेही प्रामाणिकपणे काम करत राहू. त्यामुळे त्यांच्या एजन्सीने मला खोट्या प्रकरणात अटक केली, तर शेवटी सत्याचाच विजय होईल, असा मला विश्वास आहे. खोट्या खटल्यानंतरही जामीन मिळेल, असा माझा न्याय व्यवस्थेवर आणि संविधानावर विश्वास आहे. दिल्लीची जनता सर्व काही पाहत आहे, दिल्लीची जनता भाजपाला उत्तर देईन”, असं मुख्यमंत्री आतिशी यांनी काय म्हटलं आहे.