दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कामाच्या पध्दतीचे कौतुक केले. सुषमा स्वराज चांगलं काम करत असल्याचे त्यांनी टि्वटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नायजेरियन चाच्यांकडून मरीन इंजीनियर संतोषची सुटका केल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी टि्वटरवरून दिली होती. ललित मोदी प्रकरणी सुषमा स्वराज यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्यची मागणी करणाऱ्या केजरीवालांकडून त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यात आल्याने आनेकांना आश्चर्य वाटत आहे.
परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुषमा स्वराज पुढाकार घेत असून, त्यांच्या या मदतकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील भाजपच्या संसदीय सदस्यांच्या बैठकीत त्यांच्या कामाची प्रशंसा केली होती. सुषमा स्वराज टि्वटरवर सक्रिय असून, येथे प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर त्या तात्काळ कारवाई करतात.
आपचे खासदार भगवत मान यांनीदेखील लोकसभेत बोलताना सुषमा स्वराज यांच्या कामाचे कौतुक केले होते. परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी त्या उत्तम काम करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. याशिवाय अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
Sushma ji is doing excellent work https://t.co/7SE43oboBe
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 11, 2016