दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केलीय. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास पंजाबमधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देऊ, असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचं पाऊस पडताना दिसत आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “जर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन झालं तर आम्ही १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला १,००० रुपये देऊ. हे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा होतील. एखाद्या कुटुंबात ३ महिला असतील तरीही प्रत्येक महिलेला १,००० रुपये मिळतील. कोणत्याही सरकारने महिला सबलीकरणासाठी राबवलेला हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असेल.”
हेही वाचा : केजरीवाल सरकारची घोषणा ; दिल्लीत आणखी सहा महिने रेशन मोफत मिळणार
“नकली केजरीवालपासून सावध राहा”
“ज्या वृद्ध महिलांना निवृत्तीवेतन (पेंशन) मिळते आहे त्यांना त्या व्यतिरिक्त हे १,००० रुपये मिळतील. सध्या पंजाबमध्ये एक नकली केजरीवाल फिरत आहे. मी जे काही जाहीर करतो तेच ही व्यक्ती दुसऱ्या दिवशी घोषणा करते. मात्र, या नकली केजरीवालपासून सावध राहा. तुम्हाला दिलेली आश्वासनं केवळ हा असली केजरीवालच पूर्ण करेल,” असंही केजरीवाल म्हणाले. यातील नकली केजरीवाल हा टोला पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना लगावण्यात आलाय.