पुढच्या वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि भाजपाबरोबर आम आदमी पक्षानेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या चंदीगढ भेटीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवारी मोठी घोषणा केली. पंजाबमध्ये ‘आप’ची सत्ता आल्यास प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट वीज मोफत देण्यात येईल. तसंच पूर्वीचं सर्व वीजबिल माफ केलं जाईल, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली.
मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज चंदीगढमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले,”आपला जर निवडून दिलं, तर आप सरकार प्रत्येक कुटुंबाला ३०० युनियपर्यंत मोफत वीज पुरवेल. यामुळे राज्यातील ७७ ते ८० टक्के लोकांना शून्य वीजबिल येईल. इतकंच नाहीतर थकीत बिलं पूर्णपणे माफ केले जातील आणि दिल्लीप्रमाणेच पंजाबला २४ तास वीजपुरवठा केला जाईल, असंही केजरीवाल म्हणाले.
“आपचं सरकार सत्तेत येताच हा निर्णय घेतला जाईल. वीज उत्पादक राज्य असूनही संपूर्ण देशात सर्वात महागडी वीज पंजाबमध्ये पुरवली जात आहे. वीज कंपन्या आणि सत्ताधाऱ्यांतील कथित संबंध तोडल्यास पंजाबमध्ये वीजेचे दर सर्वात कमी असतील. ज्यांची वीज कापण्यात आलेली आहे, त्यांना वीज कनेक्शन दिलं जाईल,” असंही मुख्यमंत्री केजरीवाल यावेळी म्हणाले.
– 300 Unit तक बिजली बिल माफ
– बिजली के पुराने बिल माफ
– 24 घंटे मुफ्त बिजली— AAP (@AamAadmiParty) June 29, 2021
पुढच्या वर्षी पंजाबमध्ये राजकीय घमासान
पंजाबमध्ये सत्ता काँग्रेस सत्तेत असून, विरोधी बाकांवर शिरोमणी अकाली दल आहे. तर आपनेही पंजाबमध्ये पावलं रोवण्यास सुरूवात केली आहे. तीन कृषी कायद्यावरून भाजपा आणि एनडीएतून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीसोबत आघाडी केली. तर काँग्रेसमध्ये गटबाजीला उत आला आहे. काँग्रेसमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू अशा दोन गटात संघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे हा गृहसंघर्ष काँग्रेससाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. दुसरीकडे यापूर्वीच पंजाबमध्ये पाऊल ठेवलेल्या आपने विस्तार करण्याच्या उद्देशाने कंबर कसली आहे.