अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने या दिवशी मोठ्या सोहळ्याचं आयोजन केलं आहे. त्यांनी देशभरातील हजारो लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. कारसेवक आणि त्यांचे कुटुंबीय, हजारो साधू-संत, कलाकार, खेळाडू आणि महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील अनेक मोठ्या नेत्यांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. परंतु, आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मात्र या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलेलं नाही. यावर केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली.
अरविंद केजरीवाल म्हणाले, मला औपचारिक निमंत्रण मिळालेलं नाही. मंदीर समितीने मला त्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचं अंतिम निमंत्रण पाठवलेलं नाही. परंतु, मी माझे आई-वडील आणि पत्नीसमवेत २२ जानेवारीनंतर अयोध्येला जाणार आहे. माझे आई-वडील अयोध्येला जाण्यासाठी आतुर आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अद्याप निमंत्रण पाठवलेलं नाही. परंतु, मला सांगण्यात आलं होतं की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं एक खासगी निमंत्रण मला पाठवलं जाईल. तेदेखील मला अद्याप मिळालेलं नाही. सुरक्षेच्या कारणास्तव एका निमंत्रण पत्रिकेवर केवळ एकच व्यक्ती राम मंदिराच्या आवारात जाऊ शकते. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला घेऊन २२ जानेवारीनंतर अयोध्येला जाईन.
दरम्यान, दिल्लीतल्या मध्य घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कारवाईबाबत आणि ईडीने केजरीवाल यांना पाठवलेल्या समन्सवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. केजरीवाल म्हणाले, आम्ही कायदेशीर प्रक्रियेनुसार काम करणार आहोत. आमच्या वकिलांचा सल्ला घेऊन कायद्यानुसार आम्ही पुढील पावलं उचलू.
हे ही वाचा >> “जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही…”, मनोज जरांगेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले, “राज्यातलं वातावरण ढवळलं…”
काँग्रेसने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नाकारलं
दरम्यान, काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं आहे. काँग्रेसने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, “आम्ही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारत आहोत.” काँग्रेसने राम जन्मभूमी ट्रस्टने पाठवलेलं निमंत्रण नाकारल्यामुळे २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी तसेच काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह कोणताही काँग्रेस नेता उपस्थित राहणार नाही. काँग्रेसने म्हटलं आहे की, आपल्या देशातील असंख्य लोक श्रीरामाची पूजा करतात. धर्म हा सर्वांचा खासगी विषय आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी अपूर्ण मंदिराचं उद्घाटन करत आहेत. केवळ आगामी निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे.