नवी दिल्ली :दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांना नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सिंगापूर येथील विश्व नगर संमेलनात सहभागी होऊ नये, असा सल्ला दिला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या संदर्भात गुरुवारी सांगितले की, नायब राज्यपालांच्या या पवित्र्यामुळे दिल्ली सरकार परवानगीसाठी आता थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे जाणार आहे.
पुढील महिन्यात सिंगापूरमध्ये होणाऱ्या संमेलनात मुख्यमंत्र्यांनी सहभागी होऊ नये, असा सल्ला सक्सेना यांनी दिला आहे. हे संमेलन हे महापौरांसाठी आहे. त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सहभागी होणे योग्य नाही, असे सक्सेना यांचे मत आहे. सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘‘नायब राज्यपालांनी हे संमेलन महापौरांसाठी असल्याने त्यामध्ये केजरीवाल यांनी सहभाग घेऊ नये, असा सल्ला दिला असला तरी या अगोदर अन्य राज्यांचे मुख्यमंत्री या संमेलनात सहभागी झाले होते. त्यामुळे हे ‘क्षूद्र राजकारण’ आहे. आता परवानगीसाठी आम्ही थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे जाणार असून परवानगी मिळेल, असा विश्वास वाटतो. ’’