पंजाबमध्ये गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर राजकारणात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे काँग्रेस सरकार राज्यातील आप सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहे. दुसरीकडे, अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी मुख्यमंत्री भगवंत मान अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. ‘अरविंद केजरीवाल दिल्लीतून दर आठवड्याला भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात’, असा आरोप सुखबीर सिंग यांनी केला आहे.

सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूलाही आप सरकार जबाबदार
पंजाबमधील सरकार अरविंद केजरीवाल दिल्लीतून चालवतात. केजरीवाल दर आठवड्याला भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात आणि तुम्ही सरकारी कार्यालयात बसून मजा करा सरकार मी चालवतो असे केजरीवाल मान यांना म्हणत असल्याचेही सुखबीर सिंग म्हणाले. तसेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूलाही आप सरकार जबाबदार असल्याचा आरोप सुखबीर सिंग यांनी केला आहे. आप सरकारने मुसेवालाची सुरक्षा काढून घेतली त्यामुळे त्याचे शत्रू सावध झाले आणि तो मेला, असे सिंग म्हणाले.

पंजाबमध्ये पहिल्यांदा आप सरकार

याआधी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला अंतर्गत कलहाचा फटका बसला आणि याचा फायदा आप पक्षाला झाला. भाजपा आणि अकाली दलासारख्या बलाढ्या पक्षाला हरवून पंजामध्ये पहिल्यांदाच आपचे सरकार स्थापन झाले. आप चे नेते भगवंत मान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. येत्या २३ जून रोजी संगरूर लोकसभेच्या जागेवर मतदान होणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. मात्र, पंजाबमध्ये ‘मान’ सरकारविरोधात वाढत्या आंदोलनामुळे पोटनिवडणुकीत आपच्या बालेकिल्ल्यात धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.