पीटीआय, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी कॅबिनेट मंत्रिपदासाठी आम आदमी पक्षाच्या (आप) आमदार आतिशी व सौरभ भारद्वाज यांच्या नावांची शिफारस नायब राज्यपालांकडे केली आहे. सूत्रांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार मनीष सिसोदिया व सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
भारद्वाज सध्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत व दिल्ली जल आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. ‘ग्रेटर कैलास’चे आमदार भारद्वाज आप सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही मंत्री होते. कालकाजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आतिशी या सिसोदिया यांच्या शिक्षण दलाच्या प्रमुख सदस्य आहेत. त्यांनी पूर्व दिल्ली मतदारसंघातून २०१९ ची लोकसभा निवडणूकही लढवली होती. परंतु भाजपच्या गौतम गंभीर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबाआय) गेल्या रविवारी दिल्ली मद्यविषयक अबकारी शुल्क धोरणाची निर्मिती अंमलबजावणीमध्ये कथित अनियमिततेच्या संदर्भात अटक केली होती. सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली विभागाने (ईडी) गेल्या वर्षी मेमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विरोधी पक्ष भाजपने सातत्याने लक्ष्य केल्याने सिसोदिया व जैन यांनी केजरीवाल मंत्रिमंडळाचा मंगळवारी राजीनामा दिला.
गेहलोत, आनंद यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
नवीन मंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत सिसोदिया यांची खाती कैलाश गेहलोत व राजकुमार आनंद यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. गहलोत पुढील महिन्यात दिल्लीचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे. गहलोत यांच्याकडे महसूल आणि वाहतूक यासह सहा खात्यांचा कार्यभार आहे, तर राजकुमार आनंद यांच्याकडे चार खात्यांचा कार्यभार आहे. गहलोत यांच्याकडे वित्त, सार्वजनिक बांधकामसह काही विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आनंद यांच्याकडे समाजकल्याण विभागही आहे. ते शिक्षण, आरोग्य व इतर खात्यांची जबाबदारी सांभाळतील. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय हे तीन खात्यांचा कारभार पाहत आहेत, तर इम्रान हुसैन यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि निवडणूक हे दोन विभाग आहेत. जैन यांच्या अटकेनंतर सिसोदिया यांच्यावरील कामाचा ताण जवळपास दुप्पट झाला होता. ते दिल्ली सरकारचे बहुतेक महत्त्वाचे विभाग हाताळत होते. अटकेनंतरही जैन हे दिल्ली सरकारमध्ये मंत्रीपदी होते मात्र त्यांच्याकडे कोणतेही खाते नव्हते.
‘पंतप्रधानांना दिल्लीतील चांगले काम थांबवायचे आहे’
मनीष सिसोदिरूा आणि सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील चांगले काम थांबवायचे आहे. त्यामुळे दोघांना अटक करण्यात आली, असा आरोप केजरीवाल यांनी केला. संपूर्ण देशाला सिसोदिया आणि जैन यांचा अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले. सिसोदिया यांना झालेली अटक हे केवळ निमित्त असून नवीन मंत्री सरकारचे चांगले काम दुप्पट वेगाने पुढे नेतील, असे केजरीवाल म्हणाले.