आम आदमी पक्षाच्या सत्तास्थापनेसाठी शनिवारचा (दि. २८) मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे. आपच्या सत्तास्थापनेच्या प्रस्तावाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सहमती दर्शविल्याचे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाने नायब राज्यपालांना बुधवारी पाठविले. नवीन वर्षांत ३ जानेवारीला अरविंद केजरीवाल यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल.
काँग्रेसने आठ विजयी उमेदवारांसह विनाशर्त पाठिंबा दिल्याने बहुमत चाचणीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. शनिवारी रामलीला मैदानावर अरविंद केजरीवाल आपल्या सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतील. शपथविधीस उपस्थित राहणाऱ्यांना ‘व्हीआयपी’ दर्जा न देण्याचा फतवा केजरीवाल यांनी काढला असल्याने मावळत्या मुख्यमंत्री शीला दीक्षित या सोहळ्यास अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी २६ डिसेंबरचा आग्रह केजरीवाल यांना धरला होता. त्यामुळे २४ डिसेंबरलाच रामलीला मैदान सज्ज झाले होते. मैदानाची साफसफाई करण्यात आली होती. मात्र २४ डिसेंबरलाराष्ट्रपती सचिवालयाने प्रतिसाद दिला नाही. २५ डिसेंबरला नाताळची सुट्टी असल्याने केजरीवाल यांचा २६ नोव्हेंबरचा मुहुर्त टळला. अखेरिस बुधवारी सायंकाळी उशीरा राष्ट्रपती सचिवालयाने नायब राज्यपालांच्या पत्राची दखल घेतली.  राष्ट्रपती सचिवालयाच्या विलंबामागे केजरीवाल यांचा प्रणव मुखर्जी विरोध असल्याचे मानले जाते. प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला अरविंद केजरीवाल यांचा तीव्र विरोध होता. एवढेच नव्हे तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही केजरीवाल यांनी मुखर्जी यांच्याविरोधात मुक्ताफळे उधळली होती

‘पंधरवडय़ात जनलोकपाल’
दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारण्यापूर्वीच जनलोकपाल आणण्याबद्दल केजरीवाल यांनी बुधवारी आश्वासक विधान केल़े  सत्तास्थापनेनंतर पंधरा दिवसातच हे विधेयक आणू असे ते म्हणाल़े  हे विधेयक राज्याने संमत केल्यानंतर केंद्राकडे संमतीसाठी पाठविण्याचा नियम चुकीचा असल्याची टीकाही त्यांनी केली़

‘नो व्हीआयपी’मुळे भाजप नाराज
केजरीवाल यांनी कोणतीही सुरक्षा घेणार नसल्याचे घोषीत केले आहे. मात्र, दिल्ली पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांच्याभोवती सुरक्षारक्षकांचे कडे कायम राहील, अशी भूमिका घेतली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी केजरीवाल यांच्या ‘नो व्हीआयपी’ फतव्यामुळे प्रदेश भाजप नेते नाराज झाले आहेत. विजयी उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांना व्हीआयपी पास देण्यात येतात. मात्र केजरीवाल यांच्यासह आपच्या २८ विजयी उमेदवारांनी व्हीआयपी पासेस नाकारल्याने भाजपची पंचाईत झाली़  त्यामुळे भाजपनेते सोहळ्याकडे पाठ फिरवण्याची शक्यता आह़े

Story img Loader