दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे शनिवारी त्यांची पत्नी सीमा यांना भेटले. सीमा सिसोदिया या सध्या आजारी आहेत. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या दिल्लीतल्या घरी जाऊन पत्नीची भेट घेतली. दिल्लीतल्या न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात सिसोदिया हे शनिवारी सकाळी १० वाजता पोलीस व्हॅनमध्ये बसून मथुरा रोड येथील त्यांच्या घरी पोहोचले. भेटीचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा तुरुंगात परतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, तुरुंगात परतत असताना मनीष सिसोदिया यांनी त्यांची पत्नी सीमा यांना मिठी मारली, सिसोदिया यावेळी खूप भावूक झाले होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या भेटीचा एक फोटो समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत केजरीवाल म्हणाले, हा क्षण खूप वेदनादायी आहे. ज्या व्यक्तीने देशातल्या गरीब मुलांना शिक्षणाबाबत आशा दिली त्या व्यक्तीवर होत असलेला हा अन्याय योग्य आहे का?

न्यायालयाने काही तास घरी जाण्याची परवानगी दिल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत धाकटी दिवाळी साजरी केली. न्यायालयाने निर्देश दिले असल्यामुळे सिसोदिया यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली नाही.

हे ही वाचा >> चर्चेतील चेहरा : नितीशकुमार यांचे राजकीय महत्त्व वाढले ?

न्यायालयाने यापूर्वी जून महिन्यात सिसोदिया यांना पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती. त्यांच्या पत्नीला मल्टीपल स्केलेरोसिसचा त्रास आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सीमा यांना रुग्णालयात दाखल केल्याने मनीष सिसोदिया आपल्या पत्नीला भेटू शकले नव्हते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal shares photo of manish sisodia hugging ailing wife says its very painful asc