Arvind Kejriwal five questions to RSS chief Mohan Bhagwat: आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर पक्षातर्फे ‘जनता की अदालत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले आहेत. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडणे आणि विरोधी पक्षांचे सरकार पाडणे, हे भाजपाचे राजकारण संघाला मान्य आहे का? असा खरमरीत सवाल त्यांनी भागवत यांना विचारला.

अरविंद केजरीवाल म्हणाले, मी मोहन भागवत यांचा आदर राखून त्यांना पाच प्रश्न विचारू इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात पक्ष फोडत आहेत, जेपी नड्डा म्हणतात त्यांना आता संघाची गरज उरलेली नाही. भाजपासाठी संघ आईसमान आहे, पण आता मुलगा इतका मोठा झालाय की, आईकडेच डोळे वटारून पाहू लागला आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

हे वाचा >> विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होणार; उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची घणाघाती टीका

अरविंद केजरीवाल यांनी कोणते पाच प्रश्न विचारले?

१) लोकशाहीसाठी घातक राजकारण – पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दहशत बसवत आहते. विरोधकांचे सरकार पाडत आहेत. हे लोकशाहीसाठी योग्य आहे का? मोहन भागवत यांना ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचे वाटत नाही का?

२) भ्रष्ट नेत्यांना भाजपात प्रवेश – पंतप्रधान मोदी आणि भाजपाने देशातील भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे. ज्या ज्या नेत्यांना मोदी आणि शाहांनी भ्रष्टाचारी म्हणून घोषित केले होते, नंतर त्याच नेत्यांसाठी पायघड्या घातल्या गेल्या. तुम्ही अशा भाजपाची कधी कल्पना केली होती का? याप्रकारच्या गलिच्छ राजकारणाचे समर्थन संघ करतो का?

हे ही वाचा >> देवेंद्र फडणवीस याचं काय करायचं? ‘या’ दोन पर्यायांवर सुरू आहे भाजपाचं मंथन

३) भाजपाची नैतिक जबाबदारी – अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्या प्रश्नात विचारले की, संघाने भाजपाला जन्म दिला. संघ भाजपाची जननी आहे. त्यामुळे भाजपाने योग्य मार्गक्रमण करावे, ही संघाची जबाबदारी आहे. “तुम्ही कधी नरेंद्र मोदी यांना ते चुकीच्या मार्गावर चालले आहेत, याबद्दल टोकले का? तुम्ही भाजपाच्या कार्यशैलीवर समाधानी आहात का?”, असा सवाल मोहन भागवत यांना केजरीवालांनी विचारला.

४) जेपी नड्डा यांच्या विधानावर आक्षेप – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपाला आता संघाची गरज उरली नाही, असे विधान केले होते. या विधानानंतर भाजपाची जननी असलेल्या संघाला दुःख वाटले नाही का? संघाच्या कार्यकर्त्यांना या विधानाबाबत काहीच कसे वाटले नाही.

५) ७५ वर्षांच्या नियमाचे काय झाले? – ७५ वर्ष वय झाल्यानंतर नेत्याने निवृत्ती घ्यावी, या लिखित नियमाचा हवाला देऊन अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले, या नियमाच्या आडून लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना निवृत्ती घेण्यास भाग पाडले. मात्र अमित शाह म्हणतात की, हा नियम मोदींना लागू होणार नाही. हे योग्य आहे का? मोदींना हा नियम लागू होत नाही का?

या पाच प्रश्नांद्वारे अरविंद केजरीवाल यांनी भाजपा आणि संघाच्या संबंधावर बोट ठेवले आहे. भाजपाची धोरणे आणि त्यावर संघाने घेतलेली मौनाची भूमिका यावर त्यांनी तिखट प्रश्न उपस्थित केले आहेत.