राजधानी दिल्लीतल्या गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या ईस्ट दिल्ली कॅम्पसचं आज उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर केजरीवाल यांनी भाषणाला सुरुवात केली. केजरीवाल बोलायला सुरुवात करणार इतक्यात समोर बसलेल्या उपस्थितांपैकी एका गटाने ‘मोदी…मोदी…’ अशा घोषणा देणं सुरू केलं. परंतु या घोषणांचा केजरीवाल यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट त्यांनी शांतपणे हात जोडून घोषणा देणाऱ्यांना विनंती केली आणि म्हणाले “थोडं थांबा, या घोषणा नंतर द्या.”
केजरीवाल म्हणाले, तुम्ही अशा प्रकारे या कार्यक्रमात अडथळा निर्माण कराल तर आपण बोलू शकणार नाही. तुम्हाला कल्नपा आवडली नाही तर ठीक आहे, आमची त्यावर काहीच हरकत नसेल. आम्हाला केवळ आमचं म्हणणं मांडायला पाच मिनिटं द्या. त्यानंतर तुमच्या कमेंट्स करा. तुम्ही असे मध्येच अडथळे निर्माण कराल तर मी बोलू शकणार नाही.
केजरीवाल म्हणाले, आपल्या देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. मी काही कोणाला शिव्या देत नाही. जे बोलतोय ते आक्षेपार्ह नसेल. तुम्हाला आवडलं तर ठीक, नाही आवडलं तरी काही हरकत नाही. केजरीवाल यांच्या विनंतीनंतरही हा गट गोंधळ करतच होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने हस्तक्षेप केल्यावर काही लोक शांत झाले.
हे ही वाचा >> ठाकरे गटाच्या सभेत रिकाम्या खुर्च्या पाहून संजय राऊतांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “प्रत्येकाने…”
केजरीवाल यांनी आयपी युनिव्हर्सिटी ईस्ट दिल्ली कॅम्पस देशाला समर्पित केल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन केलं. यावेळी ते म्हणाले, हा कॅम्पस भव्य आणि सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. विद्यापीठाचा हा परिसर सुंदर आहे. स्थापत्य आणि सुविधांच्या बाबतीत हा देशातील सर्वोत्तम कॅम्पस आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. यासाठी मी संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो कारण देशभरातून विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतील.