आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीएकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एनडीएकडून पुढील पंतप्रधान पदाचा चेहरा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहेत. तर, इंडिया आघाडीतून पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांचं नाव पुढे आलं आहे. उद्या (३१ ऑगस्ट) मुंबईत या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी देशभरातील अनेक वरिष्ठ राजकीय नेते मुंबईत येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर आपच्या नेत्याकडून महत्त्वाचं विधान समोर आलं आहे. इंडिया टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न सातत्याने एनडीएतील घटकपक्षातून विचारला जात होता. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार राहुल गांधी असतील अशी माहिती दिली. दरम्यान, इंडिया आघाडीत विविध विचारधारा असलेले अनेक पक्ष सामील आहेत. यामध्ये आम आदमी पक्षानेही सहभाग घेतला आहे. सुरुवातीला आपची भूमिका संभ्रमाची होती. परंतु, त्यांनी नंतर भूमिका घेऊन इंडियाला पाठिंबा दिला. परंतु, आता त्यांनी पंतप्रधान पदासाठी अरविंद केजरीवाल अशी भूमिका जाहीर केली आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये सख्य नाही. त्यामुळे इंडिया आघाडीत धुसफूस होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या निमित्ताने पहिला मिठाचा खडा पडला असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा >> अखेर ठरलं! ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? महत्त्वाची माहिती आली समोर
मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या निमित्ताने आपच्या मुख्य प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचा चेहरा कोण असावा असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “केजरीवाल यांनी नेहमीच फायदेशीर आणि लोकहितार्थी असा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी एक प्रवक्ता म्हणून मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा प्रस्ताव देईन.”
हेही वाचा >> इंडिया की एनडीए? मायावतींचं ठरलं; भूमिका स्पष्ट करताना म्हणाल्या, “२००७ प्रमाणेच…!”
“अरविंद केजरीवाल यांनी लोकांच्या फायद्याचे मॉडेल सादर केले आहे. त्यामुळे ते पंतप्रधान व्हावे अशी माझी इच्छा आहे, परंतु निर्णय माझ्या हातात नाही”, असंही त्या पुढे म्हणाल्या. केजरीवाल यांच्या उमेदवारीबाबत बोलताना आपचे दिल्लीचे संयोजक गोपाल राय म्हणाले, “प्रत्येक पक्षाला त्यांच्या नेत्याने पंतप्रधान व्हावे असे वाटते. आप सदस्यांनाही त्यांचा अरविंद केजरीवाल पंतप्रधान व्हावे असे वाटते.”