काँग्रेसच्या बाहेरून मिळालेल्या पाठिंब्यानिशी दिल्लीत सत्ता स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथविधी होणार आहे. मात्र, पक्षातील दुही दूर करण्यातच केजरीवाल यांचा वेळ सरत आहे. संभाव्य मंत्रिमंडळात मागासवर्गीयांना डावलण्याची शक्यता आणि नाराज विनोदकुमार बिन्नी यांच्या समावेशासाठी मनीष सिसोदियांना बाजूला ठेवण्याची चिन्हे यांमुळे सत्तास्थापनेआधीच ‘आप’ला मतभेदांचा ताप सोसावा लागत आहे.
दिल्ली विधानसभेच्या आरक्षित बारापैकी नऊ जागांवर आम आदमी पक्षाला विजय मिळाला. विजयी नऊ जणांपैकी केवळ राखी बिर्ला यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. सतेंद्र जैन, अरविंद केजरीवाल, सोमनाथ भारती, सौरभ भारद्वाज, गिरीश सोनी व मनीष सिसोदिया यांना मंत्रिपद दिले असले तरी मागासवर्गीयांवर अन्याय झाल्याची भावना आम आदमी पक्षात रुजली आहे. काँग्रेस नेते त्यास खतपाणी घालत आहेत.   
दुसरीकडे, मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या यादीत नाव नसल्याने नाराज झालेले विनोदकुमार बिन्नी यांच्यासाठी ऐनवेळी मंत्रिपदाच्या यादीतून मनीष सिसोदिया यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे. बिन्नी यांना मुख्यमंत्र्यांचे विधिमंडळ सचिवपद देण्याची केजरीवाल यांनी तयारी दर्शवली आहे. मात्र, खुद्द बिन्नी मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. अर्थात, बुधवारी त्यांनी ‘आमच्यात मतभेद नाहीत’ असे सांगून या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader