भाजपाचे नेते तेजिंदरपालसिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्यात दिल्ली आणि हरियाणाचे पोलीस शुक्रवारी यशस्वी ठरले आहेत. त्यानंतर शनिवारी मोहाली येथील न्यायालयाने बग्गा यांच्याविरोधात नव्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे तेजिंदरपालसिंग बग्गा यांच्यासमोरील अडचणी आता वाढताना दिसत आहेत. असं असताना आता तेजिंदरपालसिंग बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तेजिंदरपालसिंग बग्गा यांना आम आदमी पक्षात घेण्याचा प्रयत्न केला. पण बग्गाने याला नकार दिला. त्यामुळे त्याच्याविरोधात कारवाईचं सत्र सुरू केलं, असा दावा तेजिंदरपालसिंग बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांनी केला आहे.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रीतपाल सिंग बग्गा म्हणाले की, “तेजिंदरपालसिंग बग्गा याच्यावर कारवाई करू नये, असा आदेश पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशाचा आम्हाला आनंद झाला. तेजिंदरपालसिंग बग्गा यांच्याकडून केजरीवाल यांच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश होत होता. त्यामुळे ते घाबरले होते. त्यासाठी त्यांनी तेजिंदरपालसिंगला आम आदमी पक्षात घेण्याचा प्रयत्न केला. पण तेजिंदरपालसिंगने त्यांच्या प्रस्तावाला नकार दिला,” असा दावा भाजपा नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बग्गा यांच्याविरोधात पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून भाजप आणि आप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पंजाब पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर बग्गा हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या घरी परतले होते. शनिवारी मोहाली जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. माध्यमे आणि ट्विटरवर प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी हा वॉरंट काढण्यात आला होता.

न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) रवतेश इंदरजितसिंग यांच्यापुढे २३ मे रोजी सुनावणी होईल. याप्रकरणी बग्गा हे अटक टाळत असून तपास आणि न्याय होण्याच्या दृष्टीने हे अजामीनपात्र वॉरंट काढणे आवश्यक ठरल्याचे न्यायालयानं म्हटलं आहे. बग्गा यांना अटक करून न्यायालयात हजर करावे, असा आदेश त्यात देण्यात आला आहे.

Story img Loader