Arvind Kejriwal writes letter to Mohan Bhagwat : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यादरम्यान आम आदमी पार्टी (आप) चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पैसे देऊन मते विकत घेणे आणि मतदार यादीतून मतदारांची नावे काढून टाकणे अशा भाजपा करत असलेल्या चुकीच्या कामांना आरएसएसचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या या पत्राला भाजपाने पत्रानेच उत्तर दिले आहे. भाजपाने या पत्रात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षानिमीत्त पाच संकल्प करण्याची, ज्यामध्ये खोटे बोलणे आणि फसवणुक करण्याची सवय सोडून देण्याची विनंती केली आहे.
केजरीवाल आपल्या पत्रात काय म्हणाले आहेत?
अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेल्या पत्रात भाजपावर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. केजरीवाल आपल्या पत्रात म्हणाले आहेत की, “मध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार आरएसएस दिल्ली निवडणुकींमध्ये भाजपासाठी मते मागणार आहे. हे योग्य आहे का? याआधी लोकांना जाणून घ्यायचे आहे की मागील काही दिवसांमध्ये भाजपाने जी काही चुकीची कामे केले आहेत, त्यांना आरएसएसचा पाठिंबा आहे का?” असा प्रश्न केजरीवाल यांनी ३० तारखेला लिहिलेल्या पत्रात विचारला आहे.
“भाजपाचे नेते उघडपणे पैसे वाटून मते विकत घेत आहेत. आरएसएस मते विकते घेण्याचे समर्थन करते का? कितीतरी वर्षांपासून येथे राहत असूनही गरीब, ललित, झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात मते काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, आरएसएसला वाटते का की हे भारतीय लोकशाहीसाठी योग्य आहे? तुम्हाला वाटत नाही का की या प्रकारे भाजपा भारतीय लोकशाहीला कमजोर करत आहे?”, असेही केजरीवाल आपल्या पत्रात पुढे म्हणाले आहेत.
भाजपाचे केजरीवालांना प्रत्युत्तर
याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाचे नेते आणि दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी अरविंद केजरीवाल यांनी एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी केजरीवाल यांना पाच संकल्प स्वीकारण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, पहिला संकल्प आहे की, अरविंद केजरीवाल यांनी संकल्प घ्यावा की, आज नवीन वर्षात ते आपल्या मुलांची खोटी शपथ घेणे बंद करतील. दुसरा संकल्प हा घ्या की दिल्लीतील वृद्ध, महिला आणि दिल्लीतील धार्मिक लोकांना फसवण्याचे आणि खोटे बोलण्याचे जे काम ते करत आहेत त्यासाठी ते माफी मागतील. दिल्लीतील तरुणांना दारूच्या नशेत लोटण्याचा कट जो त्यांनी रचला आहे त्यासाठी त्यांनी दिल्लीची माफी मागितली पाहिजे.
सचदेवा पुढे बोलताना म्हणाले की, चौथा संकल्प हा सांगितला आहे की, यमुना नदीच्या स्वच्छेतेच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा केला आहे, त्यासाठी त्यांनी यमुना नदीची माफी मागितली पाहिजे आणि पाचवा संकल्प तुमच्या राजकीय लाभासाठी देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करता आणि त्यांच्याकडून राजकीय देणगी घेता, भविष्यात असं करणार नाही अशी शपथ घ्या, तुमच्या जीवनात या पाच गोष्टी केल्या तर तुमच्या जीवनात सुधारणा होईल”, असे वीरेंद्र सचदेवा म्हणाले आहेत.