दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू जिल्हा न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा दिवसांची ईडी कोठडी ठोठावली. त्यानंतर ‘आप’पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी तर काल (दि. २२ मार्च) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंहकारी म्हणत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर आज शनिवारी सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून पाठविलेला निरोप वाचून दाखविला. याचा एक व्हिडिओ ‘आप’कडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातील विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्या जागेवर बसून यापूर्वी एखादा संदेश प्रसारित करत असत, त्याच जागेवर बसून सुनीता केजरीवाल यांनी आपला संदेश वाचला.
काय म्हणाल्या सुनीता केजरीवाल?
“तुमचा मुलगा, भाऊ अरविंद केजरीवाल याने तुरुंगातून तुमच्यासाठी हा निरोप पाठविला आहे”, असे सांगत सुनीता केजरीवाल यांनी निरोपाचे वाचन सुरू केले. त्या म्हणाल्या, “माझ्या देशवासियांनो, मला काल अटक झाली. मी तुरुंगात असो किंवा बाहेर असो, मी माझ्या देशासाठी कायम कार्यरत राहिल. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण, माझ्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब मी देशासाठी समर्पित केलेला आहे. मी या जगात मुळातच संघर्ष करण्यासाठी जन्म घेतला आहे. मी आतापर्यंत खूप संघर्ष केला आणि सध्या जी परिस्थिती दिसत आहे, त्यावरून पुढच्या काळात माझा संघर्ष आणखी तीव्र झालेला असेल. त्यामुळेच मला या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही. मला आतापर्यंत लोकांचे खूप प्रेम मिळाले आहे. माझ्या मागच्या जन्मात मी काहीतरी चांगले काम केलेले असावे म्हणून भारतासारख्या महान भूमीत माझा जन्म झाला असावा.”
“मोदींनी अहंकारातून…”, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी व्यक्त केला संताप
अरविंद केजरीवाल यांचा निरोप वाचताना सुनीता केजरीवाल पुढे म्हणाल्या, “देशातील आणि देशाबाहेरील काही शक्ती देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या शक्तींचा पराभव करण्यासाठी आपल्याला सजग राहावे लागेल. कोणतेही तुरुंग मला अधिक काळ डांबून ठेवू शकत नाही. मी लवकरच बाहेर येऊन मी दिलेली आश्वासनांचे पालन करेल.”
‘कथित मद्य घोटाळ्यातील पैसा भाजपाकडेच गेला, जेपी नड्डांना अटक करा’; ‘आप’ नेत्याचा खळबळजनक आरोप
पंतप्रधान मोदींना सत्तेचा अहंकार
तत्पूर्वी सुनीता केजरीवाल यांनी शुक्रवारी (दि. २२ मार्च) एक्स अकाऊंटवर एक पोस्ट टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत टीका केली होती. त्यात त्या म्हणाल्या, “मोदीजींनी तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला अटक करून सत्तेचा अहंकार दाखवून दिला आहे. ते प्रत्येकाला चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कारवाई दिल्लीच्या जनतेशी केलेली प्रतारणा आहे. दिल्लीच्या जनतेसाठी त्यांचे मुख्यमंत्री कायम सोबत राहिले होते. ते तुरुंगात असो किंवा बाहेर असो, त्यांनी स्वतःचे आयुष्य देश आणि मातृभूमीसाठी समर्पित केले आहे. जनतेलाही हे माहीत आहे. जय हिंद”
दरम्यान सुनीता केजरीवाल यांनी पुढे येऊन अरविंद केजरीवाल यांचा निरोप वाचून दाखविण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाचप्रकारे केजरीवाल यांचा निरोप वाचून दाखविला होता. केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे त्यांच्या पत्नी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हातात घेऊ शकतात, अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. मात्र आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, अरविंद केजरीवाल हे तुरुंगातूनच दोन्ही जबाबदारी पार पाडतील.
भाजपाचा द्वेष करू नका, केजरीवालांचे आवाहन
केजरीवाल यांचा निरोप वाचताना सुनीता पुढे म्हणाल्या, “मी ‘आप’च्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो की, मी तुरुंगात बंद असलो तरी तुम्ही समाजसेवेच्या कामात खंड पडू देऊ नका. तसेच मला तुरुंगात टाकले म्हणून भाजपाचा द्वेषही करू नका. तेही आपले बांधव आहेत. मी लवकरच तुरुंगातून बाहेर येईल. जय हिंद.”