भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे बारसे एकदाचे उरकले असून संस्थापक सदस्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत या पक्षाचे नाव ‘आम आदमी पार्टी’ असे ठेवण्यात आले आहे. याच वेळी पक्षाची घटनाही मंजूर करण्यात आली. सुमारे ३०० संस्थापक सदस्यांची बैठक ही कॉन्स्टिटय़ूशन क्लब येथे घेण्यात आली त्या वेळी केजरीवाल यांनी पक्षाचे नाव सुचवले व ते इतर सदस्यांनीही मान्य केले.
पक्षाच्या घटनेचा प्रस्ताव मयांक गांधी यांनी मांडला व त्याला चंद्रमोहन यांनी अनुमोदन दिले. अण्णा हजारे यांच्याशी मतभेदानंतर या नवीन पक्षाची स्थापना करण्यात आली होती. हजारे यांचा राजकीय मार्ग स्वीकारण्यास विरोध होता तर केजरीवाल गटाचे म्हणणे राजकीय पर्याय स्वीकारण्यास हीच योग्य वेळ आहे असे होते.
गेल्या ऑगस्ट महिन्यात हजारे व केजरीवाल यांनी राजकीय पक्षाचा पर्याय काँग्रेस व भाजप यांच्या विरोधात उभा करण्याचे ठरवून आंदोलन मागे घेतले होते. तथापि केजरीवाल यांनी दोन ऑक्टोबरला एका नवीन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली होती. २६ नोव्हेंबर रोजी पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात येईल , कारण याच दिवशी १९४९ मध्ये राज्यघटना स्वीकारण्यात आली होती.आज बैठकीपूर्वी केजरीवाल यांनी सांगितले की, सामान्य स्त्री-पुरुष व मुले यांचा हा पक्ष आहे. ते राजकीय नेते नाहीत. ते राजकीय नेत्यांना कंटाळलेले आहेत. भ्रष्टाचार व भाववाढीला ते त्रासले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाने त्यांना आव्हान देण्याचे ठरवले आहे. आता सामान्य माणूस संसदेत बसेल. पक्षाचा हेतू हा लोकांचे राज्य आणणे हा राहील.
पक्षाने एकूण २५-३० प्रश्नांवर चर्चा करण्याचे ठरवले आहे, त्यातील कुठले प्राधान्याने घ्यायचे यावर चर्चा केली जाईल. त्याचा मसुदा हा चार ते पाच महिन्यांत तयार केला जाईल. कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी सांगितले की, पक्ष घराणेशाहीच्या विरोधात तरतूद करणार आहे, त्यामुळे तसे आमच्या पक्षात चालणार नाही.     
सामान्य स्त्री-पुरुष व मुले यांचा हा पक्ष आहे. ते राजकीय नेते नाहीत. ते राजकीय नेत्यांना कंटाळलेले आहेत. भ्रष्टाचार व भाववाढीला ते त्रासले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाने त्यांना आव्हान देण्याचे ठरवले आहे. आता सामान्य माणूस संसदेत बसेल.

Story img Loader