Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आव्हान दिलं होतं की तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणार की राहुल गांधींच्या? या आव्हानाची चर्चा होत आहे. आत खासदार अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लोकसभेतून उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अरविंद सावंत?
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु आहे. अध्यक्ष महोदय मी हे सांगू इच्छितो की मी देखील जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) मध्ये होतो पण दुर्दैवाने संयुक्त संसदीय समितीत मुद्दे विचारात घेऊन, कलमं विचारात घेऊन शेवटपर्यंत चर्चा झालीच नाही. अशा परिस्थितीत जर असं विधेयक आणलं जातं तर सरकारचं उद्दीष्ट काय? सरकारला काय हवं? या सरकारच्या कथनी आणि करणीत फरक आहे. हे बिल आणून या सरकारला कुणालाही न्याय द्यायचा नाही, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे.
तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवायची गरज नाही-अरविंद सावंत
हिंदुत्वावरुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ललकारलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाच्या बाजूने उभी राहणार की राहुल गांधींच्या. तुम्ही आम्हाला आता हिंदुत्व शिकवणार का? हिंदुत्वाच्या गोष्टी करत असतील तर माझा प्रश्न आहे की पद्मनाभ मंदिराचा जो खजिना समोर आला होता त्याचं काय झालं? तो खजिना का बाहेर काढला होता? केदारनाथ मंदिरातून ३०० किलो सोनं गायब झाल्याचं शंकराचार्यांनी सांगितलं. या सोन्याचं काय झालं? तिरुपती मंदिरावर आता तुमचं लक्ष आहे. अयोध्येत तुम्ही जे काही केलंत त्यानंतर लोकसभेला तुम्हाला लोकांनी जागा दाखवून दिली. तिथली मंदिरं तोडली गेली, मूर्ती तोडल्या गेल्या. वाराणसीतही हे प्रकार घडले. दोन्हीकडे तुमची मतं कमी झाली. तुम्ही जे काही करताय ते योग्य नाही. महाराष्ट्रात नुकताच गुढीपाडवा झाला. रमजान ईदही त्याच दिवशी होती त्यानिमित्ताने आम्ही पाहिलं सौगात ए मोदी चाललं आहे. आज सौगात ए वक्फ बिल आणलं गेलं. तुम्ही गोष्टी विसरुन जाता. आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं प्रचाराच्या वेळी की तुमचं मंगळसूत्र हिरावून घेतलं जाईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले होते बटेंगे तो कटेंगे. तुम्हाला कोण वाटणार होतं? कोण कापणार होतं? आज त्यांच्याविषयीच सौगात ए मोदी कसं काय आणलं?
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी काहीच केलं नाही अशा लोकांच्या हाती सत्ता-अरविंद सावंत
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी काहीच केलं नाही अशा लोकांच्या हाती सत्ता आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मुस्लिम लोकही अंदमानच्या तुरुंगात राहिले आहेत. मात्र जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. बिलात जे चूक आहे त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही. बोर्डबाबत सगळे सांगत होते नोंदणी प्रक्रियेनुसार बोर्डावर सदस्य येतील. याचाच अर्थ सरकारच्या मनाप्रमाणे या बोर्डावरचे सदस्य ठरतील. वक्फ बोर्डात मुस्लिम बांधव अल्पसंख्य होतील. महिलांना आरक्षण दिलं सांगू नका ते १९९५ पासूनच आहे. गैर मुस्लिम तुम्ही बोर्डावर आणत आहात. उद्या मंदिरांमध्येही तुम्ही बिगर हिंदू लोक आणून बसवू शकता अशी आम्हाला भीती आहे. असं झालं तर शिवसेना तुमच्या विरोधातच उभी असेल. कारण हे जे काही चाललं आहे ते ख्रिश्चन, जैन, शीख या सगळ्यांच्या प्रार्थनास्थळांबाबत घडू शकतं. तुम्ही ३७० कलम हटवलं आम्ही स्वागत केलं. आता किती हिंदू काश्मीरमध्ये आले? काश्मीरमध्ये जमिनी कोण विकत घेतं आहे ते पण देशाला सांगा. तुमच्या जाहीरनाम्यात काय म्हटलं होतं? आठवतंय का? असाही प्रश्न अरविंद सावंत यांनी विचारला. हे बिल आणण्यामागचा तुमचा हेतू चांगला वाटत नाही. तुम्हा लोकांना जमीन हडप करायची आहे. मणिपूरमध्येही हेच चाललं आहे. कुठल्या उद्योजकांसाठी हे चाललं आहे सगळ्यांना माहीत आहे. ओठो पे सच्चाई रहती है और दिल में सफाई रहती है. तुमच्या मनात सफाई नाही त्यामुळेच राज कपूरला पुढे सिनेमा करावा लागला राम तेरी गंगा मैली हो गयी. असाही टोला अरविंद सावंत म्हणाले.