शिवसेनेच्या अरविंद सावंत यांची शंभर टक्के उपस्थिती; चर्चेतही मोठय़ा प्रमाणात सहभाग; साताऱ्याचे उदयनराजे मात्र दांडीबहाद्दर

संसदेचे हिवाळी अधिवेशन निश्चलनीकरणाच्या निर्णयावरून वायाच गेले. अपवादानेच चर्चा झाली. तरीही अधिवेशनापूर्वी प्रश्न विचारणे, चर्चा, प्रस्ताव यासाठी राज्यातील खासदार किती सक्रिय होते याचा आढावा घेतला असता शरद पवार आणि पी. चिदम्बरम (महाराष्ट्रातून राज्यसभेवर) यांनी या अधिवेशनात एकही प्रश्न विचारला नव्हता.

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संसदेच्या दोन सलग अधिवेशनांना दांडी मारली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव पावसाळी अधिवेशनाकडे, तर मतदारसंघामधील निवडणुकांसाठी ते नुकत्याच सरलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी संसदेकडे फिरकलेच नाहीत. मात्र, दांडय़ा मारण्यापूर्वी त्यांनी संसदीय समितीकडून रीतसर रजा मंजूर करवून घेतली असल्याने खासदारकीला धोका नाही.

लोकसभा सचिवालयाकडील अधिकृत माहितीनुसार, उदयनराजे हे पावसाळी अधिवेशनात २६ दिवस (१८ जुल ते १२ ऑगस्ट १६) आणि हिवाळी अधिवेशनात सलग ३१ दिवस  गरहजर होते. मात्र, संपूर्ण अधिवेशनालाच दांडी मारण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही.  २०१४ मधील हिवाळी अधिवेशनाकडेही ते फिरकले नव्हते.

विशेष म्हणजे, हिवाळी अधिवेशनामध्ये रजा घेण्यासाठी त्यांनी ‘मतदारसंघातील निवडणुका’ असे कारण अधिकृतपणे दिले आहे. मात्र, त्यांच्या सातारा मतदारसंघामधील सातारा, कोरेगाव, महाबळेश्वर यांच्यासह सर्व नगरपालिकांच्या निवडणुकांची निकालांसह संपूर्ण प्रक्रिया २९ नोव्हेंबर रोजीच संपली. पण अधिवेशन १६ डिसेंबपर्यंत होते. म्हणजे निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर त्यांना ३० नोव्हेंबर ते १६ डिसेंबपर्यंत अधिवेशनाला हजर राहणे शक्य होते.

राज्यघटनेतील कलम १०१ (४) नुसार, सभागृहाच्या संमतीविना सलग साठ दिवस गरहजर राहिल्यास खासदारकी रद्द होते. पण उदयनराजेंना तो धोका नाही. कारण एक तर त्यांनी संसदेच्या उपस्थितीविषयक समितीकडून दोन्ही वेळेला रीतसर रजा मंजूर करवून घेतली आहे आणि दुसरी बाब म्हणजे, दांडीला सलग साठ दिवस अद्याप झालेले नाहीत.

untitled-2

Story img Loader