पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला येथील रॅलीला संबोधित करताना भारतीय सीमारेषेबाबत मोठं विधान केलं आहे. २०१४ च्या तुलनेत आता भारतीय सीमारेषा अधिक सुरक्षित असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, “मी देशाचा पंतप्रधान नसून देशातील जनतेचा प्रधान “सेवक” आहे. आणि यावर माझा ठाम विश्वास आहे.” यावेळी त्यांनी भाजपा सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या ‘गरीब कल्याण संमेलन’मध्ये विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला येथील रॅलीला संबोधित म्हटलं की, “गेल्या ८ वर्षात मी स्वत:ला एकदाही पंतप्रधान असल्याचं जाणवू दिलं नाही. मी जेव्हा कागदपत्रांवर स्वाक्षरी करतो, तेव्हाच माझ्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी असते. पण फाइल बंद होताच मी पंतप्रधान नसतो, मी देशातील १३० कोटी जनतेचा प्रधान सेवक असतो.”
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संसर्गामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी काही कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये अनाथ मुलांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत, समर्पित हेल्पलाइन आणि आयुष्यमान कार्ड अंतर्गत ५ लाख रुपयांचं आरोग्य कवच, आदी योजनांचा समावेश आहे.
भारताच्या सरकारी योजनांची जगभरात चर्चा- पंतप्रधान मोदी
२०१४ पूर्वीच्या सरकारी योजना आणि त्यांच्या काळातील सरकारी योजनांची तुलना करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पूर्वीचं सरकार योजनांबद्दल बोलायचे, मात्र त्यांना कधीही मार्ग सापडला नाही. त्यामध्ये घराणेशाही आणि घोटाळेच अधिक असायचे. पण आता सरकारी योजनांच्या फायद्यांबद्दल चर्चा होत आहे. आज जागतिक स्तरावर देखील भारताच्या स्टार्ट अपबद्दल बोललं जात. अगदी जागतिक बँक देखील भारताच्या सुलभ व्यवसायिक धोरणांबद्दल बोलते,” असंही त्यांनी म्हटलं.