;

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Goa Tourism : गोव्याकडे देश विदेशातील पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी आता यावरून स्पष्टीकरण दिलं आहे. एका मिडिया इन्फ्लुएन्सर्सने ही बाब निर्दशर्नास आणून दिल्यानंतर गोव्यातील पायाभूत सुविधा अन् तेथील नकारात्मक अनुभव पर्यटकांनी शेअर केले होते. परंतु,हा खोटा प्रचार असून याबाबत मी निंदा व्यक्त करतो, असं रोहन खौंटे म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“ज्या सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्सकडून असे खोटे प्रचार होत आहेत, ते पैसे घेऊन अपप्रचार करत आहेत. आमच्याकडे डेटा आहे. आम्ही देशांतर्गत पर्यटकांची आकडेवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मागे टाकली आहे. यंदाचाही हंगाम चांगला होता. तसंच, २०२५ मध्येही आम्हाला चांगले दिवस आहे, अशी आशा आहे. फाईव्ह आणि फोर स्टार्स हॉटेल्सची बुकींग जवळपास १०० टक्के आहे. तर, इतर श्रेणीतील हॉटेल्सही ६०-६५ टक्के फुल्ल आहेत. गोव्याचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येथे येतात. त्यामुळे गोव्याची थायलंडशी तुलना होऊ शकत नाही. आम्हाला गोव्यात थायलंडचा अनुभव घ्यायचा नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती

गोव्याची प्रतिमा मलिन करून नका

“राज्याची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेतही पर्यटन मंत्र्यांनी दिले. “आम्ही आमच्या जनसंपर्क कार्यसंघासोबत एका योजनेवर काम सुरू केले आहे आणि एकदा पूर्ण आकडे (पर्यटकांच्या संख्येचे) आले की, आम्ही ते सार्जवजनिक करू. त्यामुळे गोव्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विशिष्ट इन्फ्लुएन्सर्स उघडे पडतील”, असाही इशारा त्यांनी दिला.

टॅक्सी, हॉटेल भाडे किंवा कनेक्टिव्हिटीशी संबंधित काही समस्या होत्,त्यांचं निराकरण करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे हे मान्य करून मंत्री म्हणाले, “प्रत्येक पर्यटन स्थळासमोर केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील आव्हाने आहेत. आम्ही पर्यटकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी येथे आहोत. मी मुद्द्यांचे समर्थन करत नाही, परंतु त्याच वेळी, कोणीतरी चुकीचा संदेश तयार केला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. गोवा हे पर्यटन स्थळ असताना छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून त्रास देऊ नये”, असंही आवाहन त्यांनी केलं.

खौंटे म्हणाले की काही रेस्टॉरंट्सनी त्यांना सांगितले की इतर राज्यांतील इन्फ्लुअन्सर्स सोशल मीडियावर विशिष्ट समज प्रसारित करण्यासाठी एखाद्या मोफत जेवण किंवा मोफत राहण्याची ची मागणी करतात. त्यांनी गोव्यातील इन्फ्लुअन्सना खरी माहिती देण्याचे आवाहन केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As goas image takes a hit tourism ministers tirade against paid influencers seek free lunch and stay sgk