Dehradun accident: उत्तराखंड राज्यात मंगळवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये विद्यार्थी पार्टीत मद्य रिचवत असल्याचे समोर आले आहे. तसेच पार्टीनंतर इनोव्हा गाडीत बसलेले विद्यार्थी एका बीएमडब्लू वाहनाबरोबर वेगाची स्पर्धा करत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी झालेल्या अपघातात इनोव्हा गाडीतील सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये तरुणींचाही समावेश आहे. तर सातवा तरूण गंभीर जखमी आहे. अतिवेगाने वाहन चालविल्यानंतर इनोव्हा वाहनाची एका ट्रकला धडक बसली. सदर अपघात इतका भीषण होता की, वाहनात बसलेल्या काही तरुणांचा शिरच्छेद झाला, तसेच इनोव्हा वाहन चक्काचूर झाले.

या अपघातात गुनीत (१९), ऋषभ जैन (२४), नव्या गोयल (२३), अतुल अग्रवाल (२४) आणि कामाक्षी (२०) हे सर्व देहरादून येथे राहणारे आहेत. तर कुणाल कुकरेजा (२३) हा हिमाचल प्रदेश येथे राहणारा आहे. सातवा तरूण सिद्धेश अग्रवाल (२५) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर सिनर्जी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याच्याकडून सदर अपघात कसा घडला, याबद्दल काही माहिती मिळू शकेल, अशी आशा पोलिसांना आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सदर वाहन मृत अतुल अग्रवालच्या वडिलांचे होते. अग्रवाल हे सहारनपूर येथील फटाक्याचे व्यापारी आहेत. त्यांनी धनत्रयोदशीला इनोव्हा गाडी विकत घेतली होती. अतुल अग्रवाल इतर सहा मित्रांसह देहरादून येथे गेला होता. त्यावेळी तो स्वतः वाहन चालवत असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा वाहनाची एका ट्रकला देहरादूनच्या किशन नगर चौकात धडक बसली. समोरून येणाऱ्या ट्रकच्या वेगाचा चुकीचा अंदाज घेतल्यामुळे भीषण अपघात घडला. प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, ट्रक किशन नगर चौक येथून प्रवास करत होता. तर इनोव्हा वाहुन बल्लूपूर चौकातून देहरादूनच्या दिशेने जात होते.

प्राथमिक चौकशीनुसार, किशन नगर चौक ते ओएनजीसी चौक हे दीड किमींचे अंतर ट्रकने सहा मिनिटांत पार केले होते, याचा अर्थ ट्रकचा वेग सामान्य होता. पण इनोव्हा वाहनाची अपघातानंतरची दृश्ये पाहून अतिवेगाने वाहन चालविल्यामुळेच सदर अपघात झाला असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, अपघातापूर्वी या तरुण विद्यार्थ्यांनी पार्टीत मद्य रिचवल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडीओही समोर आणला आहे. ज्यामध्ये तरुण संगीताच्या तालावर मद्य घेत असल्याचे दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ अपघातापूर्वीचा आहे की, त्याआधीचा आहे? याबाबतची खात्री पटलेली नाही. मात्र सदर व्हिडीओ समोर आल्यानंतर मद्याच्या अमलाखाली अपघात झाला का? असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबद्दलची सत्यता समोर येऊ शकते.

Story img Loader