राजन जात आहेत, हे चांगलेच आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली. रघुराम राजन यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म मिळू नये, यासाठी सुब्रमण्यम स्वामी  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर आज राजन यांनी स्वत:हून आपण गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचे सांगितले. राजन यांच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आले असता सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, रघुराम राजन हे सरकारी नोकर आहेत आणि सरकारी नोकर हे लोकप्रियतेच्या आधारावर निवडले जात नाहीत. जेरीस आल्यामुळे आपण पद सोडून जात आहोत, असे राजन यांना भासवायचे असेल तर त्यांना तसे करू द्या. मात्र, सरतेशेवटी ते जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले.
गेल्या काही महिन्यांपासून स्वामी यांनी राजन यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. रघुराम राजन हे पूर्णपणे भारतीय नाहीत आणि ते देशाबद्दलची गोपनीय व संवेदनशील माहिती इतरांना पुरवतात, असे आरोप स्वामी यांनी केले होते. याशिवाय, त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून राजन यांना दुसरी टर्म न देण्याची मागणीही केली होती.

Story img Loader