झारखंड मुक्ती मोर्चा (JMM)चे संस्थापक शिबू सोरेन यांची सून सीता सोरेन यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. पक्षनेतृत्त्वाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. याच कुटुंबातील दुसऱ्या सुनबाई कल्पना सोरेन पक्षाचा आवाज म्हणून उदयास येत असताना सीता सोरेन यांनी भाजपात प्रवेश केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
३१ जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेमंत सोरेन यांना अटक केली. त्यामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, कल्पना यांना राजकीय अनुभव नसल्याची टीका सीता सोरेन यांनी केली होती. काही दिवसांनंतर चंपाई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. तर, रविवारी झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता समारोपात संबोधित करण्यासाठी कल्पना सोरेन यांची निवड करण्यात आली.
अभियांत्रिकी आणि एमबीए पदवी घेतलेल्या कल्पना सोरेन या त्यांचे पती हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात राजकीय प्रसिद्धीपासून दूर होत्या. झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत केंद्रातील सत्ताधारी भाजपावर राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला आहे.
हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या आदल्या दिवसांपर्यंत कल्पना या हेमंत सोरेन यांची जागा घेतील, अशी शक्यता होती. पण नंतर चंपाई सोरेनचं नाव पुढे आलं. भाजपाने तेव्हा दावा केला होता की जेएमएमचे बहुसंख्य आमदार कल्पना सोरेन यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विरोधात आहेत.
त्यांच्या अटकेनंतर कल्पना सोरेन यांनी हेमंत सोरेन यांचे ट्विटर हँडल हाताळण्यास सुरुवात केली आणि सार्वजनिक सभांमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आगामी निवडणुकीत तिला प्रचाराचा चेहरा बनवून पक्षाला जनतेच्या सहानुभूतीचे कार्ड खेळायचे आहे, हे स्पष्ट आहे. जेएमएमने लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत आणि कल्पना सोरेन यांना संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
मुंबईत कल्पना सोरेनचं भाषण, अन् सीता सोरेन यांचा राजीनामा
दरम्यान, सीता सोरेन यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मुंबईच्या रॅलीत कल्पना सोरेन यांच्या भाषणानंतर दोन दिवसांनी त्यांनी आमदारकी सोडली. JMM चा राजीनामा दिला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. पक्षप्रमुख आणि तिचे सासरे शिबू सोरेन यांना उद्देशून राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले की त्यांचे पती आणि हेमंत सोरेन यांचे मोठे बंधू दिवंगत दुर्गा सोरेन यांनी झारखंड राज्य स्थापनेच्या चळवळीत सक्रिय भूमिका बजावली.
सीता सोरेन पुढे म्हणाल्या की, पतीच्या मृत्यूपासून माझ्याकडे दुर्लक्ष केले गेले. पक्षाच्या सदस्यांनी आणि कुटुंबाने आम्हाला दूर केले आणि हे खूप वेदनादायक होते. जेएमएम पक्ष बदलला आहे आणि आता असे लोक नियंत्रित आहेत ज्यांची मूल्ये त्यांच्याशी जुळत नाहीत. आपल्याविरुद्ध कट रचला गेला आहे. मी 14 वर्षे पक्षाची सेवा केली, परंतु आजपर्यंत मला पाहिजे तसा सन्मान मिळाला नाही, असंही त्या म्हणाल्या.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर एनडीटीव्हीशी बोलताना त्या म्हणाल्या, “पक्षाने मला कोणताही पोर्टफोलिओ दिले नाही, पण मी सोबत चालले आहे. पण हे पुढे चालू शकत नाही. आणि मला विश्वास आहे की झारखंडच्या सर्व १४ जागांवर कमळ फुलेल. पक्षाशी एकनिष्ठ असूनही, मी मोकळेपणाने काम करू शकत नाही.”