भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ‘In Pranab, My Father: A Daughter Remembers’ हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातले दावे रोज समोर येत आहेत. ‘राहुल गांधी हे राजकीय दृष्ट्या परिपक्व नाहीत’ असा उल्लेख बुधवारी समोर आला होता. त्यानंतर आज ‘राहुल गांधी यांच्या कार्यालयाला सकाळ आणि संध्याकाळमधला फरक कळत नाही ते पंतप्रधान कार्यालय चालवण्याची अपेक्षा कशी करु शकतात?’ असा उल्लेख प्रणव मुखर्जींनी केल्याचं शर्मिष्ठा मुखर्जींनी पुस्तकात म्हटलं आहे. याबाबत आता काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचा हा छुपा अजेंडा असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत विजय वडेट्टीवार?
“प्रणव मुखर्जी हे काँग्रेसमधले खूप वरिष्ठ नेते होते. काँग्रेस पक्षाने त्यांना विविध पदं दिली. आता प्रश्न उरला आहे तो शर्मिष्ठा मुखर्जींच्या पुस्तकाचा. त्यावर मी इतकंच म्हणेन की भाजपाचा हा कायमचा छुपा अजेंडा आहे की दुसऱ्याच्या तोंडून तिसऱ्याला बदनाम करायचं. आमचे नेते राहुल गांधी हे प्रामाणिक चेहरा आणि स्वभाव असलेले नेते आहेत. जनतेला माहीत आहे की त्यांची मेहनत आणि त्यांची देशाविषयी असलेली भावना जनतेला ठाऊक आहे. अशात भाजपाला राहुल गांधींची भीती वाटते. भाजपाने राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी झाले नाहीत. आता शर्मिष्ठा मुखर्जींच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्या तोंडून राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरु आहे. शर्मिष्ठा मुखर्जी बहुदा वेगळा विचार करत असतील. त्यांनी बहुदा वेगळा मार्ग निवडला असावा. त्यांनी जरुर वेगळ्या मार्गाने जावं पण आमच्या नेत्यांना बदनाम करुन त्यांना काही मिळणार नाही.” असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात काय म्हटलं आहे?
“माझ्या वडिलांना (प्रणव मुखर्जी) यांना राहुल गांधी अनेकदा भेटायला येत असत. एकदा माझे वडील म्हणाले होते की राहुल गांधींच्या कार्यालयाला तर AM, PM यातला फरक समजत नाही मग अशात ते पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMO चालवण्याची अपेक्षा कशी काय ठेवू शकतात? ” शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेलं हे पुस्तक ११ डिसेंबरला प्रकाशित होणार आहे.
हे पण वाचा- “राहुल गांधींच्या कार्यालयाला AM, PM मधला फरक कळत नाही, PMO कसं चालवणार..”, काय म्हणाले होते प्रणव मुखर्जी?
पुस्तकात हा उल्लेख नेमक्या कुठल्या प्रसंगावर आहे?
शर्मिष्ठा मुखर्जी या पुस्तकात म्हणतात, “एके दिवशी सकाळी, मुगल गार्डन (आत्ताचं अमृत गार्डन) मध्ये प्रणव मुखर्जी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी राहुल गांधी त्यांना भेटायला आले. प्रणव मुखर्जींना मॉर्निंग वॉक आणि पूजा यात कुठलाही व्यत्यय आलेला चालत नसे. तरीही त्यांनी राहुल गांधींना भेटण्याचा निर्णय घेतला. याबाबत चौकशी केल्यावर त्यांना कळलं की राहुल गांधी आणि त्यांची भेट संध्याकाळी ठरली होती. मात्र राहुल गांधींच्या कार्यालयाने त्यांना सांगितलं की पूर्वनियोजित भेट सकाळी आहे. त्यांनी हा प्रसंग मला सांगितला आणि म्हणाले की राहुल गांधी यांच्या कार्यालयाला AM, PM यातला फरक कळत नाही तर मग ते पंतप्रधान कार्यालय चालवण्याची अपेक्षा किंवा स्वप्न कसं काय पाहू शकतात?” काँग्रेसने मात्र हा भाजपाचा छुपा अजेंडा असू शकतो असं म्हटलं आहे.